शिवसेनेने कोकण विभागीय आयुक्तांकडे अहवाल दाखल केला
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात १ लाख ५६ हजार ७७९ मतदारांची नावे अनेक मतदार याद्यांमध्ये दोन ते तीन वेळा नोंदवली गेली आहेत. त्यामुळे ही दुबार नोंदणी झालेली नावे तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आज कोकण आयुक्तांकडे करण्यात आली. या दुबार नावांचा अहवालही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोकण आयुक्तांना सादर केला.
शिवसेना खासदार राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार महामंडळाचे सभापती शिवसेना उपनेते विजय नाहटा (राज्यमंत्री दर्जा), जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने आज कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांची भेट घेतली आणि या दुबार नोंदणी झालेल्या मतदारांच्या नावाचा अहवाल त्यांच्याकडे सपूर्द केला. शिवसेनेच्या वतीने सादर केलेल्या अहवाला नुसार ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४१ हजार ७११, बेलापूरमध्ये ३१ हजार ४५९, कोपरी पाचपखाडीत २१ हजार एक, मीरा भार्इंदरमध्ये १० हजार ५५८, ओवळा माजिवडामध्ये ३३ हजार ६१ आणि ठाणे विधानसभा क्षेत्रात १८ हजार ९७९ मतदारांची नावे दोनदा आणि तिनदा नोंदविण्यात आली आहेत.दुबार नोंदणी झालेल्या नावांमुळे बोगस मतदानला मोठी संधी आहे, त्यामुळे ही नावे तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने कोकण विभागीय आयुक्तांकडे केली.
नोंदणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवा
सध्या सुरू असलेली मतदार नोंदणी प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात यावी. बीएलओंबाबत अनेक तक्रारी आहेत. बीएलओ पूर्णवेळ मतदार नोंदणी केंद्रात बसत नाही, त्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आणि एकच नाव अनेक मतदार याद्यांमध्ये पुन्हा पुन्हा नोंदविले जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशीही मागणी शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.