महाराष्ट्रात १८० तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. कोरड्याठक्क जमिनीला भेगा पडतायत, दुष्काळी भागातील लोकं स्थलांतर करतायत, जनावरं हंबरडा फोडतायंत. पण शिवसेनेला राम मंदिर सुचतंय. असले हे ढोंगी राज्यकर्ते नकोच, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. पैशांचे काम असले की सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि काम झालं की पुन्हा राजीनामे खिशात घालतात, असा आरोपच त्यांनी शिवसेनेवर केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी यवतमाळमध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपासह शिवसेनेवर टीका केली. भाजपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मी या दौऱ्यात अमरावतीमधील दुर्गम भागातील एका शाळेत गेलो होतो. त्या भागातील बोलीभाषा कोरकू असून तेथील जिल्हा परिषदेची शाळा मराठी माध्यमाची आहे. शाळेतील शिक्षक हिंदीतून शिकवत असून अशा मुलाचं काय होणार ?, शाळा स्थापनेनंतर ४५ वर्षांनंतर त्या शाळेचा पहिला विद्यार्थी उत्तीर्ण झाला. भाजपा- शिवसेना सरकारने हीच शिक्षणपद्धत राबवली का?. फडणवीस म्हणतात, महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला, १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मोदी म्हणाले होते २ कोटी रोजगार देणार, १.५ कोटी घरं बांधली. फक्त खोटे आकडे फेकायचे आणि थापा मारायच्या, इतके धादांत खोटे बोलणारे सरकार पाहिले नव्हते, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, दुर्गम भागातील गावकऱ्यांना मी विचारलं, “इथं काय व्हावं असं वाटतं तुम्हाला?” तुम्ही चकित व्हाल असं त्यांनी सांगितलं, “साहेब, एक बँक झाली तर बरं होईल, आता आम्हाला त्यासाठी ५० किमी लांब जावं लागतं.”. दुर्गम भागात अजूनही ही स्थिती असेल तर मग नरेंद्र मोदी, हे कोणतं डिजिटल इंडिया?, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका केली. बेरोजगारी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. गुराढोरांना चारा नाही, पण शिवसेनेला राममंदिराची काळजी आहे. शिवसेना सत्तेत आहे, पण तरीही ते सरकारवर टीका करतात. उद्धव ठाकरे काय बोलतात कळतंच नाही. सत्तेतून बाहेर का पडत नाही, यावर शिवसेनेकडून सांगितले जाते की आम्हाला सत्तेत राहून सरकारकडून काम करवून घ्यायचंय. पण प्रत्यक्षात पैशांची काम अडकली की सत्तेतून बाहेर पडायची धमकी द्यायची आणि काम झालं की पुन्हा राजीनामे खिशात घालायचे, अशा शद्बात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.