पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभ्रमणात सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. ते भगवान विष्णूचे अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागत असले तरी या जागतिक वणवणीवर आतापर्यंत १४ हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला. या परदेश दौऱ्यांमधून भारताला काय मिळाले, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सौदेबाजी व दलाली करणारी माणसे जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
मंगळवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरुन टीका करण्यात आली. जगभरातील देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी मोदींनी परदेश दौरे केल्याचा दावा केला जातो. पण या मोबदल्यात भारताला काय मिळाले यावर खुली चर्चा होणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
ज्या अमेरिकेस मोदी यांनी सर्वाधिक मिठ्या मारल्या त्या अमेरिकेने भारताला धमक्या देणे सुरू केले आहे. फ्रान्ससोबतच्या राफेल करारातील घोटाळा उघड पडला आहे. रशियाशी एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणेचा करार करताच अमेरिकेने आदळआपट सुरु केली. आधी अमेरिकेने भारताला धमकावले. यानंतर ‘रशियाकडून क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केली तसे अमेरिकेकडून एफ १६ विमाने खरेदी करा ‘ अशी मांडवलीची भाषा अमेरिकेने वापरली. विमान खरेदी न केल्यास आर्थिक निर्बंध लादण्याची धमकीच अमेरिकेने दिली. ही मैत्रीची भाषा नाही. ट्रम्प हे मोदी यांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेत असल्याचे बोलले जाते. इतके प्रेमाचे नाते असताना अमेरिकेने भारताला अशा धमक्या देणे योग्य आहे का?, असा प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केला.
मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाचे ढोल वाजवले जाते, पण देशाच्या संरक्षणविषयक सामग्रीसाठी आजही देशाला युरोप-अमेरिकेवर अवलंबून राहावे लागते. कारण हे करार मोठे असतात. बोफोर्स-राफेलप्रमाणे त्यात ‘दलाली’ खाणारे आहेत व त्यासाठीच अशा सौद्यांचे महत्त्व आहे. सौदेबाजी व दलाली करणारी माणसे जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
अमेरिका, रशिया, फ्रान्ससारखी ‘व्यापारी’ राष्ट्रे सोडा, पण देशाच्या सीमेवरील एकही राष्ट्र भारताचा मनापासून मित्र नाही. हिंदूंचा देश म्हणून नकाशावर असलेला नेपाळही चीनच्या भजनी लागला व पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचतो, याकडे लक्ष वेधत शिवसेनेने मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली.