*घणसोली मध्ये शिवसैनिकांचा शिवबंधन तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश
नवी मुंबई : शिवसेना जरी आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असली तरी पक्ष नक्की सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळेनासे झाल्याने संभ्रमात असलेले अनेक शिवसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईतील घणसोलीत आला आहे. शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
घणसोली गांवामध्ये अनेक वर्षा पासून शिवसेना पक्षाचे निष्ठेने कार्य करणाऱ्या सचिन म्हात्रे यांनी आणि घणसोली कॉलनी मधील संतोष पगारे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यंन सह मनसे मध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून आज आम्ही मनसे पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे मत सदर प्रसंगी सचिन म्हात्रे आणि संतोष पगारे यांनी मांडले
दरम्यान, घणसोली विभागातील या शेकडो शिवसैनिकांच्या मनसेतील पक्ष प्रवेशावेळी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे, शहर सचिव सचिन आचरे व घणसोली विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.