लोकनेते गणेश नाईक एसएससी सराव परिक्षेचा शुभारंभ
नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या जडणघडणीची देश आणि परदेशात कौतुकास्पद चर्चा होत असताना अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त करुन लोकनेते गणेश नाईक यांनी महाराष्ट्रात नवी मुंबई हे शैक्षणिक हब म्हणून उदयास आले आहे, असे मत व्यक्त केले आहे.
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्यावतीने एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील लोकनेते गणेश नाईक एसएससी सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ लोकनेते नाईक यांच्या शुभहस्ते झाला. त्याप्रसंगी त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार मांडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, या उपक्रमाचे आयोजक आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, उपक्रमाचे मुख्य प्रबंधक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, सभागृहनेते रविंद्र इथापे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
लोकनेते नाईक म्हणाले, नवी मुंबई शहराच्या विकासात कुणी एकाचे नव्हे तर सर्वच घटकांचे योगदान आहे. पूर्वी ज्ञानार्जनासाठी शिक्षण घेतले जात असे. त्यानंतर नोकरीसाठी ते घेतले जावू लागले. आता शिक्षण हे जीवनाभिमुख झाले आहे.
लोकनेते नाईक यांनी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचा विचार यावेळी मांडला. शिक्षण घेवून विद्यार्थी जीवनात स्थिरस्थावर झाल्यावर त्याने न विसरता शाळेचे ऋण फेडावे, अशी सूचना केली. सराव परीक्षा उपक्रमाच्या आतापर्यंतच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, मुख्य प्रबंधक अनंत सुतार यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार संदीप नाईक यांनी सराव परीक्षा उपक्रमाच्या वाटचालीचा आढावा घेतला. आतापर्यंत १ लाख ३० हजार विद्यार्थी या परिक्षेत सहभागी झाल्याची माहिती दिली. ही परिक्षा नवी मुंबईची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावत असून लोकनेते नाईक यांना अभिप्रेत शिक्षणविषयक कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कार्यरत असल्याचे नमूद केले. यावर्षी एसएससी बोर्डाच्या बदलत्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होत असल्याचे ते म्हणाले.
राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम एका वर्षी या परिक्षेच्या बक्षिस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.या परीक्षेचे व्यापक स्वरुप पाहून ही परीक्षा राज्यातील एकमेव परिक्षा असावी, असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते, अशी आठवण महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या भाषणात सांगितली. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करुन एसएससीच्या मुख्य परिक्षेला सामोरे जाण्यासाठी ही सराव परिक्षा मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते, असे त्यांनी सांगितले.
लोकनेते गणेश नाईक एसएससी सराव परिक्षेच्या शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना संकुलाच्यावतीने मोफत वितरित केल्या जाणार्या आय स्कोर या ऍपचे उदघाटन करण्यात आले तसेच सवलतीच्या दरात दिल्या जाणार्या प्रश्न आणि उत्त्रपत्रिका संचाचे देखील प्रकाशन करण्यात आले. यावर्षी एकूण ९२०० विद्यार्थी या परिक्षेला बसले असून २५ केंद्रांवर ही परीक्षा होते आहे. ती २० जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.