नवी मुंबई : वर्षाकाठी दोन कोटी नोकर्या देणे तर दूरच मात्र आहे त्या लोकांच्या कोटयवधी नोकर्या हिरावून घेणार्या शिवसेना-भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने बुधवारी कोकण भवन विभागीय मुख्यालयावर धडक निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, विविध सेलचे प्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि युवकांसह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
नोटाबंदी, जीएसटीमुळे देशात हजारो उद्योग बंद पडले. नागरिकांच्या नोकर्या गेल्या. शिकून नोकरी आणि रोजगाराची अपेक्षा असलेले करोडो युवक बेरोजगार आहेत. या फसव्या भाजपा सरकारला आता जनता फसणार नसून तिने सरकार चले जावचा नारा दिला आहे, असा इशारा प्रदेश सरचिटणीस डॉ.नाईक यांनी याप्रसंगी दिला.
मागील ४५ वर्षात देशात जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी आज शिवसेना-भाजपाच्या काळात आहे असे सांगून या सरकारने घेतलेल्या आततायी निर्णयाचे हे वाईट परिणाम असल्याची टिका आमदार नाईक यांनी केली.
शिवसेना-भाजपा सरकारने दिलेले कोणते आश्वासन पूर्ण केले आहे, याचे संशोधन करावे लागेल, असा टोला जिल्हाध्यक्ष सुतार यांनी लगावला. हे सरकार नोकरी तर देत नाही मात्र शिकून भजी तळण्याचा व्यवसाय करा, असे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मिठ मात्र चोळत असल्याबददल श्री सुतार यांनी संताप व्यक्त केला.
गरीबांच्या बचत खात्यावर १५ लाख रुपये टाकतो म्हणाले, एक फुटकी कवडी मिळाली नाही. काळा पैसा तर परदेशातून भारतात आणता आला नाही परंतु सामान्यांच्या कष्टाचा पैसा काढून घेणार्या शिवसेना-भाजपा सरकारला तरुण आता घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास युवक जिल्हाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला तर शिवसेना-भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांप्रमाणेच बेरोजगार युवकांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. देशाची अधोगती करणार्या या सरकारला देशातील तरुण आणि महिलावर्ग धडा शिकवेल, असा घणाघात महिला जिल्हाध्यक्षा सुतार यांनी केला. मोर्चाच्या शेवटी राष्ट्रवादी युवकच्या वतीने मागण्यांचे निवेदन कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
आश्वासनांचे गाजर आणि १५ लाखांचे धनादेश
आश्वासनांचे गाजर दाखविणार्या तसेच १५ लाख रुपये बचत खात्यावर टाकण्याचे आमिष दाखविणार्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवकांनी मोर्चादरम्यान हातात गाजरे तसेच १५ लाखांच्या धनादेशाची प्रतिकृती धरली होती