अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे या विरोधात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच आठही विभाग कार्यालय हद्दीत धडक कारवाई करण्यात येत असून दिघा विभागातील अनधिकृत झोपड्यांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, दिघा विभागाच्या सहा. आयुक्त प्रियांका काळसेकर यांनी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने ही झोपड्या निष्कासनाची कारवाई केली.
दिघा विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये महापालिकेच्या मालकीच्या साठे नगर येथील ओ.एस. 1 भूखंडावरील 20 अनधिकृत झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. या अनधिकृत झोपड्या हटविण्यासाठी रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीम. ममता डिसोजा व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच 1 जे.सी.बी.. 14 मजूर, 1 डंपर इत्यादी साहित्यांचा या मोहिमेत वापर करण्यात आला . यापुढील काळातही अशाचप्रकारे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे.