अनंतकुमार गवई
मुंबई : गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल १२ मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. हार्दिकने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे.
देश आणि समाज सेवेचे हाती घेतलेले उद्दिष्ट पूर्णत्वास नेऊन त्यांना मूर्तरूप देण्यासाठी १२ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, असं हार्दिकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोणतीही कायदेशीर अडचण नसेल आणि पक्षाकडून तिकीट मिळाल्यास निवडणुकीसाठी सिद्ध होऊन पक्षादेश पाळण्यास आपण तयार आहोत. देशभरातील सव्वाशे कोटी जनतेसाठी हा निर्णय घेतल्याचं त्यानं सांगितलं.
हार्दिक पटेल पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक असून, समितीच्या सदस्या गीता पटेल यांनी हार्दिकच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. दरम्यान, राजद्रोहाच्या आरोपाखाली जामिनावर असलेल्या हार्दिकनं गुजरातमधून लोकसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली होती.