स्वयंम न्यूज ब्युरो
- भाजप पायलला पैसे देऊन चालवते आहे. * शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही.
मुंबई, दि. ३ जून २०१९
भाजपातर्फे पायल रोहतगीसारख्या अनेक फिल्मी लोकांना ट्विटरद्वारे समाजात विद्वेष पसरविणे, विभूतींवर चिखलफेक करणे, त्यांचे चरित्रहनन करणे व ध्रुवीकरण करण्याची कामे दिली आहेत. त्यातूनच शिवाजी महाराजांचा अवमान करण्यापर्यंत पायलची मजल गेली, हे पाप भाजपाचेच आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
पायल रोहतगीने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानजनक ट्विटवर सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ज्या विचारधारेची पायल रोहतगी समर्थक आहे. ज्या विचारधारेची संघटना पायल रोहतगीला पैसे देऊन चालवते आहे त्याच भाजप विचारधारेने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला नकार दिला होता.त्याच विचारधारेचे लोक आता समाजात विद्वेष पसरवण्यासाठी पायल रोहतगीसारख्या व्यक्तींचा वापर करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. शिवरायांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे. कोब्रा पोस्टने मध्यंतरी स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंगमध्ये पैसे घेऊन ट्विट करू असे अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी म्हटले होते, त्यात पायल रोहतगीही होती, असे सावंत म्हणाले.
पायल रोहतगी या अर्धवट बाईने याआधी राजा राममोहन रॉय यांच्याबद्दलही असेच अवमानकारक ट्विट केले होते. सतीप्रथेची भलामणही तीने केली होती. आता या बाईची मजल छत्रपतींबद्दल चुकीची वक्तव्ये करण्यापर्यंत गेली आहे. महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्या पायल रोहतगी सारख्यांचा बोलवती धनी भाजपाच आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा कमळाचीच सत्ता आल्याने हा चिखल आता जास्तच पसरतोय, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.