मुंबई : “चलनावरून महात्मा गांधींचे छायाचित्र हटवणे, जगभरातील त्यांचे पुतळे उखडून टाकणे, रस्ते व वेगवेगळ्या संस्थांना दिलेली नावे बदलावी व शेवटी ३० जानेवारी १९४८ बद्दल गोडसेचे आभार” असे आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्माजींचे योगदान फार मोठे आहे. भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या कार्याचा आणि विचारांचा त्यांनी आपला ठसा उमटविलेला आहे. महात्माजी हे आमचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आदरणीय राष्ट्रपिता आहेत. अशा महान व्यक्तीबद्दल वाटेल तशी विधाने करुन त्यांचा अपमान करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. याचा बोलवता धनी कोण आहे? एक शासनाचा अधिकारी अशी बेताल व बेधडक विधाने कशी करु शकतो ? आमचा स्पष्ट आरोप आहे की याच्यामागे भाजप आणि रा. स्व. संघाची विचारधाराच कारणीभूत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिका स्वायत्त पदावरून त्यांची बदली मंत्रालयात केली. ही शासनाने केलेली कारवाई म्हणावी की बक्षिसी म्हणावी ? असा प्रश्न संपूर्ण भारतवासीयांना पडला आहे.
या घटनेचा महिला काँग्रेस तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. आणि यापुढे अशा घटना वारंवार घडत असतील तर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड चारुलता टोकस यांनी निक्षून सांगितले आहे.