जैवविविधता केंद्र परिसराच्या स्वच्छतेची काळजी
स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या ऐरोलीस्थित जैवविविधता केंद्र परिसरात स्वच्छ आणि आरोग्यमय वातावरण राहावे यासाठी आमदार संदीप नाईक यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून या केंद्रासाठी ई टॉयलेट आणि त्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी व्हेंडीग मशिनची सोय उपलब्ध करुन दिली आहे. आणखी एक ई टॉयलेट या केंद्रासाठी लवकरच बसविण्यात येणार असून दिवा जेटटी परिसरातील दशक्रीया घाटावर एक ई टॉयलेट स्थापित करण्यात येणार आहे. एकुण ४० लाख रुपयांचा आमदार निधी या तीन ई टॉयलेटसाठी देण्यात आला आहे.
बुधवारी जैवविविधता केंद्रात जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आणि आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत आमदार निधीतून बसविलेल्या ई टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. ई टॉयलेटचे दुसरे युनिट लवकरच बसविण्यात येणार आहे. आमदार संदीप नाईक यांच्या विधानसभेतील पाठपुराव्यामुळे ऐरोली खाडीकिनारी जैवविविधता केंद्र महाराष्ट्र शासनाने सुरू केले. तसेच बर्ड वॉचिंग एरिया निर्माण करण्यात आला. सागरी पर्यटनाला चालना मिळून या ठिकाणी असलेल्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडते. हा भाग कांदळवन संरक्षित भाग म्हणूनही घोषित करण्यात आलेला आहे. जैवविविधता केंद्राला दरवर्षी हजारो पर्यटक आणि पक्षी निरीक्षक भेट देत असतात. त्यामुळे या केंद्र परिसरामध्ये लोकांची गर्दी होत असते. या भागात स्वच्छता आणि आरोग्यमय वातावरण कायम राहावे. येथील निसर्गाला हानी पोहोचू नये याचा विचार करून आमदार संदीप नाईक यांनी या केंद्रासाठी स्थानिक आमदार विकास निधी मधून ई टॉयलेट देऊ केले आहेत. जैवविविधता केंद्रातील ई टॉयलेटमध्ये पुरुष आणि महिलांच्या वापरासाठी स्वतंत्र विभाग आहेत. महिलांसाठी सॅनिटरी व्हेंडींग मशिन आहे. हे टॉयलेट संपूर्ण स्वयंचलित असून ऑटोमॅटिक फलशची सुविधा आहे. जीपीआरएस नियंत्रित आहे. सर्वसाधारण टॉयलेटपेक्षा यामध्ये वीज आणि पाण्याची बचत होते. टॉयलेटमधील पाणी संपले असेल तेव्हां स्वयंचलित प्रणालीमुळे वापरासाठी या टॉयलेटमध्ये प्रवेश मिळत नाही.
दिवा जेटटीच्या विस्तारासाठी पालिकेने एक कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी या कार्यक्रमात केली असता कार्यक्रमास उपस्थित महापौर जयवंत सुतार यांनी ही मागणी मान्य केली. त्यामुळे दिवा भागातील मच्छीमार बांधवांना एक सुसज्ज विस्तारित जेटटी उपलब्ध होणार आहे. मासेमारी, पर्यटन, बर्ड वॉचिंग यांना चालना मिळणार आहे. लोकनेते गणेश नाईक पालकमंत्रीपदी असताना खाडी पर्यटन सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे निधी राखीव ठेवण्यात आला होता. त्यावेळी पर्यावरण विभागाची मंजूरी मिळाली नव्हती म्हणून हा निधी वापरण्यात आला नाही. पर्यावरण विभागाची मंजूरी प्राप्त झाल्यावर उशिर झाल्याची सबब सांगून हा निधी न वापरता यात राजकारण करण्यात आले, असा आरोप आमदार संदीप नाईक यांनी केला. मात्र दिवावासियांना एक चांगली जेटटी उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द असल्याचे नमूद केले.
दिवा जेटटी परिसरात ई टॉयलेट
दिवा जेटटी परिसरातील दशक्रिया घाटावर दिवा आणि परिसरातील नागरिक दशक्रीया विधी करण्यासाठी मोठया संख्येने येत असतात. तसेच कोळी बांधव मासेमारीसाठी येत असतात. मात्र या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नव्हती. नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी देखील आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून ई टॉयलेटचे एक युनिट बसविण्यात येणार आहे.