सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटच्या माध्यमातून बाजार आवारातील घटकांवर गेल्या पाच वर्षात प्रभाव निर्माण करण्याचे काम भाजपकडून सातत्याने सुरू आहे. बाजार समिती आवारातील मार्केटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव आहे. मार्केट आवारातील घटकांच्या समस्या सोडविताना त्यांच्याशी संवाद वाढवून बाजार समिती आवारातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभावाला खिळखिळे करण्याची भाजपकडून रणनीती आखली जात आहे. मार्केट आवारातील घटकांमध्ये भाजपचा वाढता प्रभाव विधानसभा निवडणूकींच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा ठरण्याची भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मार्केटमधील घटकांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कारभारावर पूर्वी कॉंग्रेसचा प्रभाव होता. मार्केट मुंबईतून नवी मुंबईत स्थंलातरीत झाल्यावर हा प्रभाव स्थंलातरीत होवून नवी मुंबईत आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर कॉंग्रेसच्या अस्तित्वाला मार्केट आवारात घरघर लागून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रभावाखाली बाजार समितीचा परिसर आला. बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणूकीत विजयी होणारे व पराभूत होणारे घटकही राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच होते. मार्केट आवारावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव असताना व राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी असताना मार्केट आवारातील समस्या सोडविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखविलेली उदासिनताच आज मार्केटमधील भाजपाचा प्रभाव वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.
मार्केटमधील घटक पूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असतानाही समस्या काश्मिर प्रश्नासारख्या प्रलंबित राहील्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचा बोनकोडेच्या नाईक परिवाराचा दोष नसून पूर्णपणे दोष मंत्रालयात असणाऱ्या व मार्केटसंबंधित कारभार सांभाळणाऱ्या तत्कालीन मंत्र्यांचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी व तत्कालीन मंत्र्यांनी दाखविलेल्या उदासिनतेची किमंत आज नवी मुंबईत नाईक परिवाराला चुकवावी लागत आहे. मार्केट आवारातील मातब्बर, नावाजलेले, प्रस्थापित घटकही थेट मंत्रालयात जावून बैठका घेत होते.
आमदार मंदाताई म्हात्रे या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या असल्याने त्यांना मार्केट आवारातील राष्ट्रवादीच्या प्रभावाशी परिचित असल्याने त्यांनी प्रारंभापासूनच हा प्रभाव खिळखिळे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी प्रारंभापासून मार्केट आवारातील समस्या सोडविण्याचा सपाटा चालविला आहे. बाजार आवारातील घटकांना थेट मंत्रालयात नेवून संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घडवून आणत आहेत. कांदा बटाटा मार्केटची पुर्नबांधणी, भाजी मार्केटच्या घटकांचे २८५ गाळ्यांची अतिरक्त भाजी मार्केट, किराणा दुकान मार्केट, फळ मार्केट, धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपयश आले. अतिरक्त भाजी मार्केटमध्ये बहूउद्देशीय मार्केट बनविण्यात भाजपचे असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. आमदार मंदा म्हात्रेंचा मार्केटमधील वाढता जनसंपर्क पाहता येथील घटकांमध्ये भाजपप्रेम वाढीस लागले आहे. चंद्रकांत पाटील सुरूवातीच्या काळात पणनमंत्री असताना त्यांनी बाजार समिती आवारातील समस्या सोडविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आता मार्केटशी संबंधित मंत्रीपद राम शिंदेंकडे आहे. राम शिंदे १५ जुलै रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मार्केटमधील घटकांशी सुसंवाद साधण्यासाठी येत आहेत. मार्केट आवारातील मंत्रालयीन जवळीक, आमदार मंदा म्हात्रेंचा वाढता जनसंपर्क, प्रलंबित समस्यांना फुटलेली वाचा, समस्यांचे होवू लागलेले निवारण मार्केट आवारातील दलदल ‘कमळा’चा प्रभाव वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. उद्या राम शिंदे बाजार आवारात भेट देत असल्याने मार्केटमधील घटकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादीचे घटक माथाडी मेळाव्याशिवाय मार्केटकडे फिरकत नसल्याचे बाजार आवारातील घटकांकडून उघडपणे बोलले जात आहे.