अॅड . महेश जाधव : navimumbailive.com@gmail.com
सध्या नवी मुंबईच्या राजकारणात गेली आठवडाभर नाईक परिवार आणि भाजपप्रवेश याशिवाय कोणताही एककलमी कार्यक्रम सुरुच आहे. यामध्ये अनेकदा अफवांचाच आणि चावडी गप्पांचाच समावेश अधिक आहे. या चर्चामधून नवी मुंबईतीलच नाही तर समस्त ठाणे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. प्रत्येक जण आपल्या अकलेचे तारे तोडत कधी बातम्यांमधून तर कधी सोशल मिडीयातून आपले ज्ञान पाजळण्यात व्यस्त आहेत. नाईकांच्या दरबारातील हुजऱ्या मुजऱ्यांनाही कमालीचे महत्व असले असून सूत्र म्हणून त्यांच्याशीही संपर्क साधला जात आहे. यातून एकच साध्य होते, नाईक कालही नवी मुंबईचे राजे होते, आजही आहे आणि उद्याही असणार.
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी म्हणून मोजक्याच लोकांचा समावेश आहे. त्यामध्ये नवी मुंबईसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये प्राधान्याने आमदार संदीप नाईकांचाही समावेश होत आहे. पण संदीप नाईक हे खऱ्या अर्थाने शापित गंर्धवच म्हटले पाहिजे. या माणूस मितभाषी व अबोल असल्याने तसेच प्रसिध्दी माध्यमांपासून जाणिवपूर्वक चार हात लांब असल्याने संदीप नाईकांचे बोलणे व चालणे हे एकप्रकारे मोनालिसाच्या हास्याप्रमाणेच गूढ बनलेले आहे. संदीप नाईक प्रसिध्दी माध्यमांपासून लांब असले तरी प्रसिध्दीमाध्यमे मात्र त्यांच्याशी जवळीक साधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. संदीप नाईकांना प्रसिध्दी मिळविणे आवडत नाही तर कामे करून लोकांची मने जिंकण्याची, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याची आवड आहे. काही माणसांवर चिखलफेक करण्याची विकृतीच आज समाजव्यवस्थेमध्ये वाढीस लागलेली आहे. त्या माणसाची भूमिका समजावून न घेता त्याची प्रतिमा बिघडविण्याचे षडयंत्र अलिकडच्या काळात वाढीस लागले आहे. कोणीतरी चांगले काम करत असताना त्याचे खरे चित्र उभे न करता त्याची प्रतिमा मलीन करणे, त्याला बदनाम करणे या विकृतीमध्ये रममाण होणाऱ्या मंडळींमुळे समाजातील चांगल्या माणसांवर आज कलंकित होण्याची वेळ आली आहे. समाजापुढे चुकीचे चित्र निर्माण होत असते. दुर्दैवाने याच विकृतीचा आज नवी मुंबईच्या विकासपर्वाला अर्थात आमदार संदीप नाईकांना सामना करावा लागत आहे. या माणसाचे वास्तव रूप समाजापुढे न आणता चुकीचे चित्र समाजासमोर मांडण्याचे उद्योग काही घटक जाणिवपूर्वक करत आहेत, दुर्दैवाने त्यात मिडीयातील घटकांचाही सहभाग असल्याने लोकांचा प्रसिध्दी माध्यमांवरील विश्बास का उडाला आहे याचे उत्तर यातूनच मिळते.
संदीप नाईकांचे कार्य, त्यांच्या कार्याची रूपरेषा, त्यांची ध्येय धोरणे, त्यांचा स्वभाव याबाबत काडीमात्र माहिती नसणारे अथवा त्याविषयी जाणून न घेणारे घटक ज्यावेळी संदीप नाईकांबाबत बातमीतून अथवा सोशल मिडीयातून अकलेचे तारे तोडतात, त्याविषयी त्याची किव करावीशी वाटते आणि आमदार संदीप नाईकांबाबत सहानुभूती वाढीस लागते. आमदार संदीप नाईक हे लोकनेते गणेश नाईकांचे धाकटे चिरजिंव. राजकारणात असूनही गोरगरीबांमध्ये, बहूजनांमध्ये समरस होणारे तसेच तळागाळातील घटकांशी मैत्री जोपासणारे संदीप नाईक म्हणजे मोदींच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास बाथरूममध्ये आंघोळ करतानाही रेनकोट घालतात. राजकारणाच्या दलदलीतील स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक व पवित्र नेतृत्व. पण दुर्दैवाने या नेतृत्वाबाबत जनसामान्यांपुढे चुकीचे चित्र मांडले जाते. एका सज्जन माणसाला खलनायक बनविले जाते. त्यातून काय साध्य होणार आहे ते असा कपाळकरंटेपणा करणाऱ्यांनाच माहिती.
- संदीप नाईकांचा गणेश नाईकांवर दबाव आहे, भाजपप्रवेशासाठी ते गणेश नाईकांना राजी करत आहे.
मुळातच संदीप नाईक व गणेश नाईक हे पितापुत्र आहेत. कोणत्या राजकीय प्रवाहातील नेते व कार्यकर्ते नाहीत. संदीप नाईकांचे गणेश नाईकांवर बेफाम प्रेम आहे. गणेश नाईकांना ते पिता नाही तर दैवत समजतात. गणेश नाईकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी ते कोणत्याही थराला जावू शकतात. कलियुगातील या श्रावणबाळाला सत्तेचा महत्वाकांक्षी असे चित्र उभे करत नाहक बदनाम केले जात आहे. गणेश नाईकांवर दबाव आणण्याइतपत संदीप नाईक अजून मोठे झाले नाहीत व होणारही नाहीत. पित्याच्या सावलीत त्यांना वावरायचे , पित्याच्या सावलीला लहान करून स्वत:ची सावली मोठे करण्याचे पातक संदीप नाईक या जन्मी तर सोडा, कोणत्याच जन्मात करणार नाही. अशा बातम्यांनी, सोशल मिडीयावरील चर्चांनी चांगल्या माणसाला खलनायक ठरविताना त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले जाईल, कौंटूबिंक वातावरणावर परिणाम होईल. घरात गैरसमज वाढीस लागतील याचाही विचार केला जात नाही. हे तेच संदीप नाईक आहेत, जे स्वत:चा, स्वत:च्या बायको-मुलाचा विचार न करता सदोदित माई, दादा, डॉ. संजीव नाईक, सागर नाईक यांचाच अधिक विचार करत असतात. घर जोडणारा माणूस स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी आपल्या दैवतावर दबाव कसा आणू शकतो. त्यामुळे संदीप नाईकांविरोधात प्रारंभापासून षडयंत्र का सुरू आहे याचे उत्तर सहजपणे समजून येते. ज्याची राजकारणात स्वच्च प्रतिमा आहे, जनाधार आहे, तळागाळातल्या जनतेशी मैत्री आहे, बहूजनांमध्ये आदराचे स्थान आहे, अशा संदीप नाईकांचे अस्तित्व अनेकांना त्रासदायक ठरत असल्याने संदीप नाईकांना प्रसिध्दीमाध्यमातून चुकीचे चित्र रंगवून बदनाम केले जात आहे.
जे संदीप नाईक आहेत, ते का दाखविले जात नाहीत, जे संदीप नाईक उभ्या हयातीत नाहीत तेच चित्र का उभे केले जात आहे. संदीप नाईक हा कुटूंब वत्सल माणूस आहे. संदीप नाईक शिक्षण संपवून नुकतेच उद्योग पाहण्यास सुरूवात केली होती. आम्ही त्यावेळेपासून त्यांना ओळखतो. ते एकदा नवनगरच्या कार्यालयात आले असता, त्यांनी आज वनवैभवची पत्रकार परिषद आहे , बातमी आली का म्हणून विचारणा केली. नाना दहीहंडीचा चांगला कार्यक्रम राबवित असल्याचे व्याख्यान त्यांनी दिले. काहींनी छोटी बातमी दिली. तर संतप्त होत संदीप नाईकांनी बातमी मोठी बनवा. संस्थावृत्तही वेगळे बनवा असे सांगितले. नानांची जनसेवा, पाणीप्रकरणी महापौर असतानाही नानांनी काढलेला मोर्चा यावरही संदीप नाईक भरभरून बोलत होते. पण हे चित्र संदीप नाईकांचे का दाखविले गेले नाही. नानांवरही संदीप नाईकांचे बेफाम प्रेम होते. पण हा माणूस स्वत:ची मार्केटींग करत नाही अथवा येत असलेल्या चुकीच्या अफवांचे खंडनही करत नाही. त्यामुळेच आजतागायत असे करणाऱ्यांचे फावले आहे.
वाशी मुसळधार पावसात तुंबलेली असताना गळ्याएवढ्या पाण्यात नाल्यात उतरून संदीप नाईक नालेसफाई करत होते. कंडोनिअमअंर्तगत विकासकामांच्या प्रस्ताला मंत्रालयात मंजुरी मिळावी म्हणून पाठपुरावा करताना अनेकदा गाडी बिघडणे, वाहतुक कोंडी घडल्यावर दुसऱ्या वर्गातून संदीप नाईकांनी रेल्वे प्रवास केला. हे चित्र संदीप नाईकांचे नवी मुंबईकरांसमोर का मांडले गेले नाही. सातत्याने चुकीचे चित्र संदीप नाईकांचे उभे करून का एका चांगल्या नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात आहे, प्रतिमा मलीन केली जात आहे. यामध्ये काहींना विकृत समाधान भेटत असेल पण या नवी मुंबई शहराचे व नवी मुंबईकरांचे न भरून येणारे नुकसान होत आहे, याचाही यानिमित्ताने गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. संदीप नाईक आहे तसे मांडा, त्यांना सादर करा. चुकीचे सादरीकरण करून त्या बिचाऱ्याला शापित गंधर्व ठरवू नका. अशी माणसे जनकल्याणासाठी शतकात नाही तर सहस्त्रकांत जन्माला येतात, याची जाणिव ठेवा आणि नवी मुंबईचे नुकसान करू नका.