सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : एकेकाळी नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा लढविण्यासाठी आघाडीत कधीही संधी मिळणार नाही, याची खूणगाठ मनाशी बाळगलेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बदलत्या राजकीय समीकरणामुळे नवी मुंबईतील दोनपैकी एक लागा लढविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ऐरोलीच्या तुलनेत बेलापुर लढविणे सोपे जाणार असल्याची अटकळ कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बेलापुरच्या जागेसाठी दशरथ भगत, अनिल कौशिक, संतोष शेट्टी व रवींद्र सावंत हे चार प्रबळ दावेदार मानले जावू लागले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बोनकोडेचा नाईक परिवार सक्रिय असेपर्यत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीमध्ये ऐरोली व बेलापुर या दोन्ही विधानसभा जागा कॉंग्रेसला येणार नसल्याची खात्री कॉंग्रेसच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही होती. परंतु नाईक परिवार भाजपमय होवू लागल्याची चिन्हे दिसू लागताच विधानसभा निवडणूक लढविण्याच्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्वित होवून नेतेमंडळींच्या महत्वाकांक्षा जागृत होवू लागल्या. दशरथ भगत, नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश पदाधिकारी व नवी मुंबई महापालिकेत सलग चार वेळा नगरसेवक राहीलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत या चार नावांची प्रबळ दावेदारांमध्ये चर्चा होवू लागली आहे.
दशरथ भगत यांच्या घरात पत्नी, भावजय, भावाची सून असे तीन नगरसेवक असून त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळलेले आहे. मध्यंतरी उपमहापौर निवडणूकीत भगत परिवाराने बंडखोरी करत उपमहापौर पदाची निवडणूक लढविली होती. त्यावेळेपासून दशरथ भगत काही काळ कॉंग्रेसपासून अलिप्त झाले होते. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आंदोलने करत त्यांनी आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. वाशी खाडीपुलापासून नेरूळ सेक्टर दोनपर्यत म्हणजेच अर्ध्या बेलापुर विधानसभा मतदारसंघापर्यत दशरथ भगत यांचा जनसंपर्क आहे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दशरथ भगत यांची भेट घेत त्यांना कॉंग्रेसी प्रवाहात पुन्हा सक्रिय केले आहे. दशरथ भगत हे तीन वेळा पालिका सभागृहात नगरसेवकही होते.
नवी मुंबई अध्यक्ष असलेले अनिल कौशिक हे एक प्रबळ दावेदार असले तरी त्यांना अनेकदा पालिका निवडणूकीत सपाटून मार खावा लागलेला आहे. कौशिक हे दुसऱ्या सभागृहात कॉंग्रेसचे नगरसेवक व उपमहापौर असले तरी त्यानंतर त्यांना एकदाही पालिका निवडणूकीत यश मिळालेले नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीतील अपयशाचा ठपका त्यांच्या विधानसभा निवडणूक दावेदारीला अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
संतोष शेट्टी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून चार वेळा महापालिकेत ते नगरसेवक राहीलेले आहेत. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आदी पदावर त्यांनी काम केले आहे. ते पालिका सभागृहात नसले तरी त्यांनी त्यांच्या प्रभागातून कॉंग्रेसची नगरसेविका निवडून आणण्यात यश मिळविले आहे. बेलापुर मतदारसंघात असलेली परप्रातिंयाची संख्या पाहता त्यांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस संतोष शेट्टींना उमेदवारी देण्याची शक्यता अधिक प्रबळ मानली जात आहे.
चौथे प्रबळ दावेदार असणारे रवींद्र सावंत हे नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष असून कामगार नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. नेरूळ तालुका कॉंग्रेसचे ते अध्यक्ष असून प्रदेश पातळीवर तसेच मंत्रालयात त्यांची बऱ्यापैकी उठबस आहे. रवींद्र सावंत हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने नवी मुंबईतील त्या भागातीलक रहीवाशांना कॉंग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस रवींद्र सावंत यांच्या नावाचाही विचार करण्याची शक्यता कॉग्रेस वर्तुळात व्यक्त केली जात आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिल्लक घटकांपैकी कोणी उमेदवारीसाठी कॉंग्रेसच्या गळाला मातब्बर लागतो का, याचीही चाचपणी कॉंग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.