नवी मुंबई : मराठी माणूस हा अन्यायाविरोधात स्वाभिमान जपत कायम पेटून उठलेला आहे. येत्या निवडणुकीत हा स्वाभिमान दाखवण्याची वेळ आल्याचे सांगत पवारांनी एकप्रकारे आगामी निवणुकांचे बिगुल वाजवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. व माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी भाजपा सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते नवी मुंबई सिवूडस येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.
देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे.अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी या सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याचा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला.
गिरणी कामगारांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, एकेकाळी गिरणगावात १२० गिरण्या होत्या. मात्र आत्ताच्या सरकारने जमिनी विकून गिरण्या नष्ट केल्या. त्यावर इमले चढवले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. आजच्या राज्यकर्त्यांच्या नीती कष्टकरी कामगारांच्या हाताला बळकटी देण्याची नाही असा आरोप त्यांनी केला. लातूर येथील खिल्लारी गावात झालेल्या भूकंपाचे उदाहरण त्यांनी दिले. संकटकाळी प्रशासनाने त्या जागेवर जाणे गरजेचे असते. मात्र सांगली, कोल्हापूर पुरात अडकलेले असताना इथे महाजनादेश यात्रा काढण्यात सत्ताधारी व्यग्र असल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहील्याचे ते म्हणाले. तुम्हीच सत्ताधारी म्हणून काय केले ते सांगण्यापेक्षा विरोधकांना नाव ठेवण्यात सत्ताधारी गढलेले असल्याचे दिसते. यातून यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याचे निष्पन्न होत असल्याची घणाघाती टीका पवारांनी केली.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांकडे देशाचे लक्ष लागल्याचे सांगताना शरद पवार पुढे म्हणाले की, इथे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सत्ता नसताना अडचणी आल्या तर त्या दूर करण्याची हिम्मत लागते असा टोला त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला. सत्ता असताना हे लोक पक्ष का सोडतात याचे आश्चर्य वाटते असे सांगत याउलट विरोधी पक्षात असल्यावर अधिक काम करता येत असल्याचे त्यांनी स्वानुभवावरून सांगितले. आज १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात, तरीही आपण गप्पा बसायचे का? त्यांची चेष्ठा करण्याचे काम आताचे सरकार करत आहे. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांच्या पंगतीत बसण्यामागे या नेत्यांचा काय दृष्टिकोन असावा असा खोचक सवाल पवार यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबईतील कार्यक्रमात व्यासपिठावर प्रथमच गणेश नाईक उपलब्ध नसल्याचे सांगताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नवी मुंबईचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करा. गणेश नाईक राष्ट्रवादी का सोडून गेले याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळाले नाही. नवी मुंबईच्या प्रगतीचे मुळ हे पवारांच्या विचारात आहे. सत्तेशिवाय जगणे मुश्किल असे मानणारा वर्ग सोडून गेला. म्हणे नगरसेवक सोडून जात आहेत म्हणू जावे लागत आहे. हे हास्यस्पद असून नगरसेवकांच्या मागे धावणारे नेते नसून कार्यकर्ते असतात. एक गेला तर १० नगरसेवक तयार करण्याची ताकद नेत्यात हवी, अशी टीका पाटील यांनी गणेश नाईकांवर केली. मोदींनी गडकरीना सांगितले की नवे प्रकल्प हातात घेऊ नका. देशाची आर्थिक स्थिती ठीक नाही. महराष्ट्रात औद्योगिक वसाहती सर्वाधिक असल्याने या मंदीचा परिणाम महाराष्ट्रावर जास्त होणार आहे असेही पाटील म्हणाले. तर गणेशोत्सव संपल्यावर गणेशच्या विसर्जनाबाबत बोलण्याची आपली संस्कृती नाही असा टोला खा. अमोल कोल्हे यांनी लगावला. अमित शहा सोलापुरात येऊन शरद पवारांनी काय केले हे विचारतात यांची हिमंत कशी होते हे विचारण्याची असे ते म्हणाले. राज्यात आज शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे नागपूर गुन्हेगारीत अग्रेसर ठरत आहे. ५ लाख कोटींचे कर्ज राज्यावर असताना यांच्या पंगतीत हे नेते जातात कसे अशी टीका कोल्हे यांनी केली. तर जे गेले ते दबावामुळे गेले की कशामुळे असा प्रश्न त्यांनी स्वतः ला विचारावा. नवी मुंबईचे शिल्पकार शरद पवार आहेत. त्यांनीच साडेबारा टक्के, माथाडींना घरे, मोरबे धरण या सुविधा या शहराला मिळवून दिल्या असे आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी आंबेगावचे आमदार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जगात घाबरलेल्यांचा इतिहास लिहिला जात नाही. सत्ता गेली म्हणून नवी मुंबईत पक्षांतर झाले आहे. त्यांनी खुशाल जावे. नवी मुंबईत पवारांच्या विचारांची शक्ती उभारण्याचे काम करू. जितेंद्र आव्हाड हे नाईकांवर टीका करताना म्हणाले की, सध्या संक्रमण काळ सुरू आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, वागळे इस्टेट ही पवारांची देणं आहे. तेव्हा गणेश नाईक कॉलेजमध्ये होते. साताऱ्यात वॉर्डात नगरसेवकपदाला हरणाऱ्यांना पवारांनी खासदार केले. ८० वर्षांचे पवार साहेब तरुणांना घाम फोडतात हे दिसते. विकास जाऊन मंदी जन्माला आली. पाकिस्तानची साखर व कांदे कसे चालतात यांना. अमित शहांनी ‘एक देश, एक भाषा’ अशी घोषणा केली आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नसल्याची टीका आव्हाड यांनी केली.यावेळी नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, फळ मार्केटचे माजी संचालक बाळासाहेब बेंडे, मच्छिमार नेते चंदू पाटील, नगरसेविका सपना गावडे, नगरसेविका संगीता बोऱ्हाडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, तेजस शिंदे, माजी नगरसेवक जी. एस. पाटील, नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.