सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीच्या मतदानाला आता अवघ्या २८ दिवसाचाच कालावधी राहीला असतानाच नवी मुंबईतील बेलापुर या विधानसभा मतदारसंघात सध्या अफवांचाच महापुर आला आहे. या अफवांमुळे सुरू असलेल्या चावडी गप्पांमुळे सर्वसामान्य जनतेची उत्सुकता वाढीस लागली असून जनतेचे मनोरंजनही होत आहे. या अफवांमुळे निवडणूक लढवू पाहणाऱ्या मातब्बरांचे, त्यांच्या पक्षीय पदाधिकाऱ्यांचे, समर्थकांचे, कार्यकर्त्यांचे ‘टेन्शन’ मात्र वाढीस लागले आहे.
जागावाटपामुळे बेलापुर मतदारसंघामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीमध्ये तर भाजप-शिवसेना युतीमध्ये बेलापुर मतदारसंघावरून कलगीतुरा सुरू आहे. आघाडीमध्ये हा मतदारसंघ सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविलेला आहे. आता मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गडालाच खिंडार पडल्याने व स्थानिक भागातील संस्थानिक असणारे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसह ‘कमळा’ला आपलेसे केल्याने आज नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सध्या तीन नगरसेवक असून कॉंग्रेसचे सात नगरसेवक आहेत. या बळावर कॉंग्रेसने दावा करत बेलापुर लढविण्यासाठी तयारीही सुरू केली आहे. कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, वाशी नोडमधून घरातील तीन नगरसेवक निवडून आणणारे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नावाची बेलापुर मतदारसंघासाठी जोरदार चर्चा सुरू आहे.अनिल कौशिक व दशरथ भगत हे एकेकाळचे गुरू-शिष्य असले तरी सध्या त्यांच्यात फारसे सख्य राहीलेले नाही. दशरथ भगत यांचे पुतणे नवी मुंबई कॉंग्रेसचे युवा नेतृत्व निशांत भगत यांच्याकडे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात असलेली युवकांची फळी दशरथ भगतांसाठी प्रचारादरम्यान उजवी बाजू ठरणार आहे. अनिल कौशिक हे महापालिकेच्या दुसऱ्या सभागृहात नगरसेवक असले तरी त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणूकीत ते सतत पराभूत झाले आहेत. त्यामुळे एकीकडे स्वबळावर घरातीलच तीन नगरसेवक निवडून आणणारे दशरथ भगत व पालिका निवडणूकीत सतत पराभूत होणारे अनिल कौशिक यातूनच जागावाटपात कॉंग्रेसला मतदारसंघ आल्यास निवड करावी लागणार आहे. त्यातच वाशी खाडीपासून तर थेट नेरूळ सेक्टर २ मधील राजीव गांधी उड्डाणपुलापर्यत दशरथ भगत व त्यांच्या परिवाराचा जनसंपर्क मागील ५ वर्षात वाढीस लागल्याने दशरथ भगत यांचे तिकिटसाठी पारडे सध्या जड मानले जात आहे. संतोष शेट्टी हे सध्या नवी मुंबई कॉंग्रेसमध्ये ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असल्याने त्यांच्याकडे अनेकांचा राबता अलिकडच्या काळात वाढीस लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील बेलापुरसाठी आग्रही असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. अशोक गावडे यांची मदार पश्चिम महाराष्ट्राच्या मतांवर प्रामुख्याने असून गावडे हे निवडणूक रिंगणात उतरल्यास पवारसमर्थकांची मते व पश्चिम महाराष्ट्राचा समाज यामुळे गावडे यांची उमेदवारी मतदारसंघातील मतदानाच्या समीकरणात गोंधळ निर्माण करण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपात सध्या राज्यपातळीवरच जागावाटप आणि युतीवरूनच कलगीतुरा असतानाच त्याचे छोटेखानी प्रतिबिंब बेलापुर विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. बेलापुरला विद्यमान आमदार भाजपचा असला तरी ऐरोली भाजपला जात असेल तर बेलापुर शिवसेनेला सोडण्याची स्थानिक शिवसेनेची आग्रही मागणी आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी मागील पाच वर्षात केलेली बेलापुर विधानसभा मतदारसंघात केलेली संघटनात्मक बांधणी, विविध कार्यक्रम आयोजनातून नवी मुंबईकरांपुढे सतत ठेवलेला स्वत:चा चेहरा आणि जनसंपर्क यासाठी विजय नाहटा यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार भाजपच्या असल्या तरी तिकिट कोणाला मिळणार यावरून पक्षाच्या कार्यकर्त्यात संभ्रमाचे वातावरण आहे. बेलापुरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी मागील पाच वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात असंख्य चांगली कामे केली आहे. व्यक्तीगत पातळीवर जनसंपर्कही वाढविला आहे. भेटीगाठीचे सत्र व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राबविलेले ‘चाय पे चर्चा’ हे चर्चासत्र आणि महिला म्हणून महिलांमध्ये मिळविलेले आदराचे स्थान यामुळे मंदा म्हात्रे यांचा बेलापुरातील जनसामान्यांवरील प्रभाव सध्या प्रथम क्रमाकांचा मानला जात आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईतील मातब्बर नेतृत्व असणारे गणेश नाईक यांनी नुकताच त्यांच्या कार्यकर्त्यांसह व पदाधिकाऱ्यांसह व नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केल्यामुळे बेलापुर मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीसाठी त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. नवी मुंबई महापालिकेवर सध्या असणारा भाजपा बहूमताचा झेंडा गणेश नाईकांमुळेच फडकू लागला आहे. विधानसभा तिकिट त्यांचे निश्चित असल्याचे नाईक समर्थकांकडून जाहिरपणे सांगण्यात येत आहे. मंदा म्हात्रे यांना भाजपने तिकिटवाटपात डावलल्यास त्यांना शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारीसाठी पायघड्या अंथरण्याची दाट शक्यता आहे. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसऐवजी शिवसेनेतून निवडणूक लढविल्यास त्या पुन्हा एकवार ‘जायंट’ किलर ठरण्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. महिला वर्गात मंदा म्हात्रेंना असणारी सहानूभुती सर्वच उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सध्या बेलापुर विधानसभा मतदारसंघात अफवांच्या लाटांना उधान आले असून अफवांच्या बाजारात आपणाला हवी तशी राजकीय समीकरणे खपविण्याचा उद्योगही काही राजकीय घटकांकडून केला जात आहे.