सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सध्या भाजपामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असल्याने सोशल मिडियावर ‘भाजप खुर्द व भाजप बुद्रुक’ असे जोरदार विनोद सुरू आहेत. नवी मुंबई कार्यक्षेत्रातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेतृत्व व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केल्याने नवी मुंबई भाजपमय झाली असून महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकू लागला आहे. परंतु जुन्या व नव्यांचा अद्यापि मनोमिलाफ न झाल्याने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील भाजपात आजही उघडपणे ‘भाजप खुर्द व भाजप बुद्रुक’ प्रकार पहावयास मिळत आहे.
नवी मुंबईतील जुन्या भाजपेयींनी अद्यापि नाईक व त्यांच्या समर्थकांचा मनापासून स्वीकार न केल्याने अधिकांश भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बॅनर नाईकांचे दर्शन होत नाही. काही अपवादात्मक बॅनरवर नाईकांचे दर्शन होत असले तरी अजून खुर्दने बुद्रुकला सामावून घेतले नसल्याचे उपहासाने बोलले जात आहे. दोनच दिवसापूर्वी कोपरखैराणे येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटनाच्या वेळी असणारी निमत्रंण पत्रिका ‘व्हायरल’ झाली असून त्यात गणेश नाईकांचे नाव दुसऱ्या ओळीत अगदी रामचंद्र घरतांच्या खाली टाकण्यात आल्याने नाईक समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गणेश नाईक समर्थक भाजपात आले असले तरी मनापासून त्यांनी अद्यापि भाजपचा स्वीकार केला नसल्याचे त्यांचे खासगी व सार्वजनिक संभाषणातून पहावयास मिळत आहे. आम्ही पक्ष व नेता कोणाला मानत नसून गणेश नाईक हाच आमचा पक्ष असे उघडपणे सांगत असल्याने जुन्या भाजपेयींना हा पक्षाचा अपमान वाटू लागला आहे. अनेक ठिकाणी एकाच प्रभागात भाजपची दोन कार्यालये असून खुर्द व बुद्रुकमध्ये त्या त्या भागातील भाजप विभागल्याचे दिसून येत आहे. जुन्या व नव्यांचा मिलाफ न झाल्याने व नव्याने आलेल्या घटकांची उर्मट भाषा व सोशल मिडियावर ‘नाईक हाच पक्ष’ ही जाहिरातबाजी पाहता प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने मनोमिलाफासाठी पुढाकार न घेतल्यास नवी मुंबई भाजपात यापुढील काळात ‘खुर्द व बुद्रुक’ कायम पहावयास मिळणार आहे. बुद्रुकच्या लोंढ्यापुढे खुर्द हतबल होण्याची भीती जुन्या भाजपेयींकडून व्यक्त करण्यात येत आहे.