सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मतदानाला आता अवघ्या २७ दिवसाचाच कालावधी राहीला असतानाच बेलापुर विधानसभा मतदारसंघात भाजपात ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक अथवा भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्यात तिकिट मिळविण्यासाठी जोरदार चुरस आहे. गणेश नाईकांना मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास भाग पाडले जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाल्याने गणेश नाईक समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवून आपल्या ‘दादां’ना विधानसभेचे तिकिट भेटणार नसेल तर भाजपात यायचेच कशाला होते असा संतापही गणेश नाईक समर्थकांकडून खासगीत व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबई महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यानंतर साडे चोविस वर्षानंतर महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ५०हून अधिक त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आणि या राजकीय घडामोडीमुळे यापूर्वी दोन आकडी संख्याबळ न गाठणाऱ्या भाजपाला सत्तारूढ होता आले. मागील विधानसभा निवडणूकीत भाजपाकडून निवडणूक लढविताना मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना जवळपास १५०० मतांनी पराभूत केले होते. परंतु आता तेच गणेश नाईक मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक तसेच नगरसेवकांना भाजपात घेवून आल्याने बेलापुरातून भाजप कोणाला तिकिट देणार यावरून राजकारणात पैंजा, चावडी गप्पा, दावे-प्रतिदावे, गुप्त बैठका आदी घडामोडींना उधाण आले आहे.
बेलापुर मतदारसंघातून गणेश नाईकच विधानसभा लढविणार असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असतानाच मंदा म्हात्रे यांचे समर्थकही तिकिट ‘ताईं’नाच भेटणार असा दावा करत आहे, इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी ‘ताई’ला तसा शब्दही दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेश नाईकांना भाजपा नेतृत्व मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास भाग पाडेल अथवा तिकिट वाटपात डावलून भाजप पक्षसंघटनेत ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पक्षसंघटना वाढविण्यासाठी पद देणार असल्याचीही चर्चा जोरदार सुरू आहे.
गणेश नाईकांना तिकिट मिळणार नसल्याच्या चर्चेने त्यांच्या समर्थकांमध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून अस्वस्थता वाढीस लागली आहे. ‘दादां’ना तिकिट मिळणार नसेल तर आम्ही कोणाचा प्रचार का म्हणून करायचा, आमचे उमेदवार दादा असे सांगत खासगीत नाईक समर्थक आपला राग आळवू लागले आहे. बेलापुरातून भाजपचे तिकिट मिळविण्यासाठी नाईक व म्हात्रे यांच्यात सध्या जोरदार चुरस असून दोघांचेही समर्थक तिकिट आपणालाच मिळणार असल्याचे सांगत असल्याने ठाणे जिल्ह्याचे लक्ष बेलापुरातील राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे.