सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मतदानाला आता अवघ्या २६ दिवसाचाच कालावधी राहीला असतानाच नवी मुंबईतील बेलापुर व ऐरोली विधानसभा मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीचा सहभाग मतदानातील समीकरणात उलथापालथ करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वंचित वादळ बेलापुर व ऐरोली विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची झोप उडविणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
लोकसभा निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवाराला नवी मुंबईतून जवळपास २५ हजाराच्या आसपास मतदान झाले होते. त्यावेळी वंचित बहूजन आघाडी नव्यानेच स्थापन झालेली होती आणि शिवसेनेच्या राजन विचारे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आनंद पराजंपेच्या तुलनेत वंचित बहूजन आघाडीचा उमेदवारही नवखा होता. आता मात्र तशी परिस्थिती नाही. वंचित बहूजन आघाडीकडून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख ख्वॉजामियॉ पटेल तर बेलापुर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीचे नवी मुंबई प्रमुख विरेंद्र लगाडे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. ही दोन्ही नावे चर्चेतील असून नवी मुंबईतील आहेत. गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईतील सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात ख्वॉजामियॉ पटेल आणि विरेंद्र लगाडे हे दोघेही गेल्या काही वर्षापासून सक्रिय कार्यरत आहेत. पटेल व लगाडे यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम व मागासवर्गिय समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर वळण्याची भीती आता प्रस्थापितांकडून व्यक्त केली जात आहे.
ऐरोली मतदारसंघातून प्रबळ दावेदारी मानल्या जाणाऱ्या ख्वॉजामियॉ पटेल हे गेल्या काही वर्षापासून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. तुर्भेसह ऐरोली मतदारसंघातील झोपडपट्टीमय परिसरात ख्वॉजामियॉ पटेल यांना मानणारा वर्ग आहे. आंदोलनाची व चळवळीची पार्श्वभूमी पटेल यांची आहे. त्यात आता वंचितचे पाठबळ पटेल यांच्या पाठीशी आहे. विरेंद्र लगाडे यांची सानपाडा, जुईनगर, नेरूळ पश्चिम, सिवूडस भागात चांगली ओळख आहे. कला, संगीत व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विरेंद्र लगाडे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यरत राहील्यावर विरेंद्र लगाडे यांनी शिवसेनेत अनेक वर्ष शाखाप्रमुख म्हणून काम सांभाळले आहे. शिवसेनेकडून महापालिका निवडणूकही लढविली आहे. आंबेडकरी समाजात लगाडेंच्या नावाला मागील काही वर्षात वलय प्राप्त झालेले आहे. त्यानंतर २०१५च्या महापालिका निवडणूकीच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभाग ८५ व ८६ या दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिंकून देण्यात लगाडेंची भूमिका महत्वाची राहीलेली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सहकारात ओळख आहे. संगीत, गायन क्षेत्रात त्यांनी मागील काही वर्षात हक्काचे व्यासपिठ मिळवून दिलेले आहे.
वंचित बहूजन आघाडीकडून ऐरोलीतून ख्वॉजामियॉ पटेल तर बेलापुरातून विरेंद्र लगाडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने मागील दोन महिन्यापासून दोघांनी ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढताना प्रचारात आघाडी घेतली आहे. मुस्लिम व मागासवर्गिय समाजाचा वंचित आज दिसणारा पाठिंबा मतपेटीतून उतरला तर प्रस्थापितांना वंचितची ही जोडगोळी ‘दे धक्का’ करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. महायुती व महाआघाडी जागावाटप व उमेदवार निश्चितीमध्ये व्यस्त असतानाच वंचितचे पटेल व लगाडे मतदारसंघ पिंजून काढण्यात व्यस्त असल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे.