सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर सध्या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई शहरातील बेलापुर हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना तिकिट मिळाले का त्यांचे तिकिट कापले गेले, गणेश नाईकांचे काय झाले, विजय नाहटाच्या हालचाली अचानक गतीमान का झाल्या, यासह जागावाटपात बेलापुर विधानसभा मतदारसंघ नक्की शिवसेना-भाजपा यापैकी कोणाच्या वाट्याला गेला, या चर्चामुळे नवी मुंबईतील बेलापुर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
सोशल मिडियावर नजट टाकली असता गणेश नाईक, मंदा म्हात्रे व विजय नाहटा यांचे समर्थक जीवाच्या आकातांने तिकिटही आम्हालाच व मतदारसंघ आम्हाला व विजयही आमचाच याबाबत घसा कोरडा पडेपर्यत टाहो फोडत आहे. शिवसेना-भाजपातील जागावाटपात सध्या ज्या पाच जागेवरून गुंता सुरू आहे. त्यात नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोन्ही मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. ऐरोली मतदारसंघात भाजपच्या संदीप नाईकांच्या तुलनेत शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्याने शिवसेना या जागेबाबत फारशी आग्रही प्रारंभापासून राहीलेली नाही. मात्र उपनेते विजय नाहटा यांच्यासाठी शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची बनविलेली आहे. विजय नाहटा हेदेखील गेली तीन वर्षे बेलापुर विधानसभा मतदारसंघात सातत्याने संघटनात्मक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून चर्चेत राहीलेले आहेत. शिवसेना-भाजपात बेलापुरच्या जागेवरून आटोकाट संघर्ष सुरू असून कदाचित या जागेवर दिल्ली दरबारातच तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. एक-दोन जागांवरून युती तोडण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा पर्यायही शेवटच्या क्षणी स्विकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही शक्यता धुसरच आहे. विद्यमान आमदार भाजपाचा असल्याने अखेरच्या टप्प्यात बेलापुरच्या आग्रह शिवसेनेला सोडून द्यावा लागणार असल्याची माहिती भाजपच्या प्रदेश सूत्रांकडून देण्यात येत आहे.
जागावाटपात अद्यापि या जागेबाबत तोडगा निघालेला नसतानाही वृत्तवाहिन्यावरील बातम्यांनी तसेच सोशल मिडियावरील चर्चांनी नाईक व म्हात्रे तसेच नाहटा समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. शिवसेना-भाजपा दोन्ही घटक बेलापुर आपणच लढविणार असल्याचा छातीठोकपणे दावा करत आहेत. शिवसेनेचे सध्याचे चाणक्य ‘प्रशांत किशोर’ हे सध्या शिवसेनेची रणनीती ठरवित असल्याने त्यांची माणसे बेलापुर विधानसभा मतदारसंघात फिरू लागल्याचे वृत्त सकाळपासून शिवसैनिकांत पसरताच त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. मतदारसंघ निश्चित झाल्याशिवाय प्रशांत किशोरची माणसे बेलापुराची चाचपणी करणार नसल्याचे शिवसेना वर्तुळात सांगण्यात आले आहे. सकाळपासून शिवसेनेच्या व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ वाढीस लागल्याने भाजपामधील घटकांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता वाढीस लागली आहे. इच्छूकांमधील भाजपच्या एक गटाकडून व शिवसेनेच्या एका गटाकडून हॉल बुकींगच्या हालचाली सुरू झाल्याने ‘बेलापुरा’तील कलगीतुरा राजकीय सारीपाटावर सध्या बेलापुरचा टीआरपी वाढवू लागला आहे. बेलापुराबाबत उमेदवारी अथवा जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपाचे काहीही निश्चित झाले नसल्याचे शिवसेना भवनातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.