सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका लढवायच्या की नाही लढवायच्या याबाबत तळ्यात-मळ्यात राजकीय चित्र होते. तथापि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूका लढविण्याचा निर्णय पक्षसुप्रिमो राज ठाकरे यांनी निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई कार्यक्षेत्रात बेलापुरातून गजानन काळे व ऐरोलीतून निलेश बाणखिले हे विधानसभा लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
गजानन काळे व निलेश बाणखिले यांच्या संभाव्य उमेदवारीने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकाही ७ महिन्यावर आलेल्या असल्याने या निवडणूकीच्या निमित्ताने मनसैनिकांची महापालिका निवडणूकीची रंगीत तालीमही होईल आणि प्रभागात आपल्या पक्षाला कितपत जनाधार आहे याचीही चाचपणी करणे त्यांना शक्य होणार आहे. गजानन काळे व निलेश बाणखिले हे नवी मुंबई मनसेतील मातब्बर नेतृत्व असून ऐरोली नोडमध्ये निलेश बाणखिले यांना मानणारा वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे.
मागील विधानसभा निवडणूकीत बेलापुर व ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघाची जमाबेरीज केल्यास आकडा दहा हजारापर्यतही गेला नव्हता. परंतु या पाच वर्षाच्या कालावधीत राजकीय उलथापालथ झाल्याने तसेच भाजपाला दोन्ही मतदारसंघ गेल्यास नाराज शिवसैनिकांची मनसेला साथ लाभण्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेसाठी विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची असून मनसेला जनाधार नसल्याची जी सतत चर्चा होत असते, ती चर्चा मतपेटीतून जनधारातून खोडण्याची संधी मनसैनिकांना उपलब्ध झालेली आहे. मनसेला आंदोलनात्मक कार्यक्रमातून प्रसिध्दी मिळाली असली तरी ती क्षणिक असते. वर्तमानपत्रातील बातम्या व फेसबुकवरील टीवटीव असे मनसेच्या बाबत नवी मुंबईत नेहमीच उपहासाने बोलले जात असते. मनसेला आपली लोकप्रियता मतपेटीत न उतरवता आल्याने व जनाधार कमविण्यात मर्यादा पडल्याने मनसेला फारसे आजवर गांभीर्याने घेण्यात आले नाही. जनाधार नसलेल्या पक्षाला जनसामान्यांमध्ये फारशी किमंत नसते. त्यामुळेच मनसेकडून गजानन काळे व निलेश बाणखिले या मातब्बर मोहऱ्यांची प्रतिष्ठा मनसे निवडणूकीत पणाला लावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. भाजपाला दोन्ही जागा गेल्यास नाराज शिवसैनिक मनसेला छुप्पी साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सानपाडा नोडमध्ये योगेश शेटे या जुन्या स्थानिक युवा नेतृत्वाला सक्रिय करण्यात नवी मुंबईतील मनसेकारांना यश आल्यामुळे सानपाड्यात पुन्हा एकवार मनसेची लवकरच हवा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठीबहूल विभागातही मनसेला न मिळणारा जनाधार गजाजन काळेसारख्या नेतृत्वाच्या यशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करू लागला आहे.
गजानन काळे व निलेश बाणखिले यांच्या प्रचारात मनसैनिक आक्रमकता दाखविण्याची चिन्हे असली तरी ही आक्रमकता शेवटच्या दिवसापर्यत टिकविण्यासाठी ‘रसद’ पुरविण्याची जबाबदारी काळे व बाणखिले या जोडीला पार पाडावी लागणार आहे. बाणखिले पश्चिम महाराष्ट्राचे (पुण्याचे) असल्याने त्यांना चांगला जनाधार मिळण्याची चर्चा मनसैनिकांमध्ये सुरू आहे. गजानन काळे व निलेश बाणखिले यांच्या निवडणूक सहभागामुळे नवी मुंबईत मनसेला असलेला जनाधार २५ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी समजून येणार आहे.