राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
पनवेल : विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (गुरुवार, दि. ०३) आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांचासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे आज शक्तीप्रदर्शन हा विषयच नव्हता, मात्र हजारॊ कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आपला जल्लोष दाखवून दिला आणि त्याचे रूप शक्ती प्रदर्शनात रूपांतरित झाले होते. यावेळी ‘अबकी बार एक लाख पार’, ‘एकच वादा प्रशांतदादा’, ‘प्रशांतदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा गगनभेदी घोषणांनी पनवेल दुमदुमला होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि लोकप्रतिनिधी, हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथून निघालेली रॅली शहरातून प्रांत अधिकारी कार्यालय येथे पोहोचली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मागील दोन विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारली असून यावेळी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळेल अशी खात्री पनवेल मतदार संघातील मतदार नागरिक देत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात केलेल्या कामांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा आणि दांडगा जनसंपर्क असलेले सर्वसामाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांगिण आणि शाश्वत विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना सर्व स्तरातून मानणारा वर्ग मोठा आहे. उड्डाणपूल, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय, तालुका क्रीडा संकुल, अशी महत्वपूर्ण कामे करण्याबरोबरच शहरांसोबत ग्रामिण भागाचा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास ते साधत आहेत. सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी दिला. आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, तसेच इतर शासकीय निधीच्या माध्यमातून कार्याचा झंझावात सुरूच ठेवला, त्यामुळे त्यांना विकासमूर्ती म्हणून ओळखले जात आहे. येणाऱ्या काळातही विकासाचा महामेरू अधिक गतीने चालणार आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणार आहेत, पण हा विजय एक लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने असावा अशी संपूर्ण मतदार संघातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्तेही सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र आज अर्ज दाखल करताना दिसत होते.