शिवसेना शहरप्रमुख विजय मानेंनी गुरूवारी बेलापुर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी भाजपशी निवडणूकीविषयी जागावाटपाची चर्चा करताना नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोन्ही जागा भाजपला दिल्याने नवी मुंबई शिवसेनेत उमटलेले असंतोषाचे धुमारे अजूनही शांत होण्याची चिन्हे नाहीत. नवी मुंबईचे शहरप्रमुख विजय माने यांनी गुरुवारी बेलापुर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला तर उद्या शेवटच्या दिवशी शिवसेना उपनेते विजय नाहटा ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना सूत्रांनी दिली.
बेलापुरच्या भाजपा उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी तिकिट भेटल्यावर मातोश्रीची वारी गेल्याने शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये मंदाताईंविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर’ व्यक्त केला जात आहे. शिवसैनिकांनी आचारसंहितेमध्ये केलेल्या रास्ता रोकोमुळे वाशी व कोपरखैराणेत निर्माण झालेल्या समस्येचा पोलिस आढावा घेत असल्याने ऐन निवडणूक शिगेला असताना शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांवर कारवाई होण्याची भीतीही शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई शिवसेनेत नाराजी असल्याने वाशीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सतत बैठका होत असून ठाण्यातील नेतेमंडळींची वाढती उठबस, हजेरी व मार्गदर्शन यावर भाजप बारील लक्ष ठेवून आहे. ऐरोलीत नाईकांना त्रास व्हावा म्हणून ठाणेकर सक्रिय झाले असले तरी ठाण्यात नाईकांना मानणारा मोठा वर्ग आजही असल्याने ऐरोलीतील घडामोडीचे ठाण्यात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ऐरोलीबाबत खतपाणी घालू पाहणाऱ्या ठाणेकरांना संजय केळकरांच्या ठाणे शहरापाठोपाठ अजूनही एक-दोन मतदारसंघ गमवावे लागणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईतील शिवसैनिकांची नाराजी एकवेळ समजण्यासारखी असली तरी ठाणेकरांच्या नवी मुंबईतील वाढत्या हालचालींची भाजपकडून गंभीर दखल घेण्यात आली असून ठाण्यातील मतदारसंघावर आता भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गणेश नाईकांनी अजून उमेदवारी अर्जही भरला नाही तोच काहींना पालकमंत्रीपदाची भीती वाटू लागल्याचे राजकारणात आताच उपहासाने बोलले जावू लागले आहे. नवी मुंबईतील घडामोडीचे पडसाद आता ठाणे शहर व सभोवताली पडू लागले आहे. नाईकांना मानणारा ठाण्यातील एक मोठा वर्ग ठाण्यातील शिवसेनेला प्रचंड त्रासदायक ठरण्याची शक्यता असून ठाण्यातील शिवसेनेला नवी मुंबईतील घडामोडीमुळे भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नवी मुंबईतील शिवसेना एकजीव दिसत असली तरी आगामी काळात ती कितपत एकत्र राहीला याबाबत शिवसेना वर्तुळातच प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.