सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सलग दोन वेळा ‘जायंट किलर’ ठरलेल्या भाजपच्या आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रेंनी आपला बेलापुर विधानसभा निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज गुरूवारी सादर केला. यावेळी माजी महापौर सागर नाईक, महापालिका सभागृह नेते रवींद्र इथापेंसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतविधानसभा निवडणूकीत तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जवळपास १५०० मतांनी पराभव करत महाराष्ट्रातील ‘जायंट किलरां’च्या यादीत आमदार मंदाताई म्हात्रेंचा समावेश झाला होता. आता गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक या रथीमहारथींसह महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ५० नगरसेवकांनी, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी, नाईक समर्थकांनी मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला. गणेश नाईकांच्या भाजपप्रवेशामुळे भाजप यंदा मंदाताई म्हात्रेंचे तिकिट कापणार अशीच चर्चा नवी मुंबईत जोरदार सुरू होती. तथापि भाजपने प्रकाशित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मंदाताई म्हात्रेंचे बेलापुर विधानसभा मतदारसंघाकरिता नाव पाहून ‘मंदाताई’ या राजकीय सुंदोपसुंदीच्या लढाईत खऱ्या अर्थाने दुसऱ्यांदा ‘जायंट किलर’ ठरल्या आहेत.
आमदार मंदाताई म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माजी महापौर सागर नाईक, सभागृह नेते रवींद्र इथापेंसह नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले अनेक नगरसेवक उपस्थित राहील्याने कालच संदीप नाईकांनी नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच केले होते, त्याची आज प्रचिती आली.
सागर नाईकांसह असंख्य नगरसेवक मंदाताई म्हात्रेंचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित झाल्याने भाजपात नाईक-म्हात्रे गट नसून केवळ भाजपाच असल्याचे दिसून आल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.