सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मतदानाला आता अवघ्या २७ दिवसाचाच कालावधी राहीला असतानाच बेलापुर विधानसभा मतदारसंघात जागावाटपापासून ते उमेदवार निश्चितीपर्यत सर्वच सावळागोंधळ सुरू आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी ही जागा जागावाटपात शिवसेनेलाच मिळणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. युती नाही झाली तरी स्वबळावर लढण्यासाठीही शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची उमेदवारी गृहीतच धरून बेलापुर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने नाहटा यांच्या प्रचाराची जोरदार तयारी करत आघाडी घेतली आहे. सोशल मिडियावरही विजय नाहटाचाच बोलबाला झालेला सध्या तरी दिसून येत आहे.
शिवसेना-भाजपामध्ये बेलापुरच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ऐरोली भाजपला जाणार असेल तर बेलापुर शिवसेनेला द्यावी यासाठी नवी मुंबई शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. जागावाटपावरून युती तुटणारच हे निश्चित धरून शिवसेनेने बेलापुरात प्रचारात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यात भाजपच्या तिकिटसाठी जोरदार चुरस आहे. म्हात्रे व नाईक यांच्या समर्थकांकडून मात्र तिकिट आपल्यालाच मिळणार असा दावाही केला जात आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीत जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी तेथेही जोरदार संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अशोक गावडे व कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
बेलापुर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी युती व आघाडीत प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला असतानाच शिवसेनेकडून उपनेते विजय नाहटाचीच उमेदवारी गृहीत धरून शिवसेना शाखा व नगरसेवक कामाला लागल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. बेलापुरातील युवा सेनेवर विजय नाहटांचेच वर्चस्व असून युवा सेनेचे सर्व पदाधिकारी नाहटांना मानतात. त्यामुळे शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी गेल्या काही दिवसांपासून नाहटांच्या प्रचारात व्यस्त झाल्याचे ठिकठिकाणी चित्र पहावयास मिळत आहे.