सुजित शिंंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात एकतर्फी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून गणेश नाईकांसारखे दिग्गज नेतृत्व निवडणूक रिंगणात एकीकडे उतरविले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेकडून तुलनेने मातब्बर उमेदवार नसल्याने मातब्बर विरोधकांअभावी ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा विजय सुकर मानला जात आहे.
जागावाटपात शिवसेना-भाजपा महायुतीमध्ये नवी मुंबईतील दोन्ही ऐरोली व बेलापुर या दोन्ही विधानसभेच्या जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक कमालीचे नाराज असून उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचारातील रॅलीदरम्यान शिवसेना भाजपापासून अलिप्त असल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. भाजपा उमेदवार व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा अपवाद वगळता शिवसेनेचे कोणीही फारसे उपस्थित नव्हते. ऐरोलीत शिवसेनेकडून कोणी बंडखोरी केली नसली तरी शिवसेना प्रचारअभियानापासून चार हात लांब असल्याने सध्या भाजपाला ऐरोलीत प्रचारादरम्यान ‘एकला चलो रे’ अभियान राबवावे लागत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माथाडी घटकांच्या गणेश शिंदेंना व मनसेकडून निलेश बाणखिलेंना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. गणेश नाईक या मातब्बर उमेदवाराला लढत देण्याइतपत उमेदवार देण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेला अपयश आले आहे. मनसेचे उमेदवार निलेश बाणखिले युवा वर्गात लोकप्रिय असले तरी ऐरोली नोडमधील दोन-चार प्रभागापुरतेच त्यांचे वलय सिमित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने माथाडी चळवळीतील गणेश शिंदेंना उमेदवारी दिली असली तरी कोपरखैराणेतील तीन-चार माथाडी टक्क्याचा प्रभाव असलेल्या पालिका प्रभागांचा अपवाद वगळता गणेश शिंदे फारसा परिचित चेहरा नाही. त्यातच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी मतदारसंघात मतदान होणार असल्याने ऐरोली मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारापुढील अडचणी वाढीस लागल्या आहेत. यापूर्वी राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीमध्ये तीन ते चार टप्प्यात मतदान होत असल्याने कोपरखैराणे, घणसोली, ऐरोली, तुर्भेतील माथाडी टक्का गावी मतदान करून पुन्हा नवी मुंबईतील निवासी कार्यक्षेत्रात मतदान करायला येत असे. परंतु आता तसे होणार नाही व माथाडी टक्का नवी मुंबईच्या राजकारणापेक्षा गावच्या राजकारणात अधिक स्वारस्य दाखवित असल्याने ते गावालाच मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ‘आधीच उल्हास, त्यास फाल्गुन मास’ अशी अवस्था ऐरोली मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था झाल्याने हक्काच्या मतदानावर आता पाणी पडणार आहे.
मनसेची मदार ऐरोलीतील मराठी टक्क्यावर काही प्रमाणात आहे. निलेश बाणखिले मनसेचा चर्चेतील चेहरा असला तरी ऐरोलीतील तीन-चार मनपा प्रभागाशिवाय निलेश बाणखिलेंचा फारसा प्रभाव चालणार नाही. एकीकडे मनसे व राष्ट्रवादीच्या प्रचार अभियानाला फारशी गती आलेली नसतानाच भाजपाकडून मात्र ऐरोली मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात झाली आहे. या मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहीलेल्या संदीप नाईकांकडून ऐरोलीतील भाजपच्या प्रचाराची सूत्रे सांभाळली जात आहे. सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळात रॅली काढून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. ऐरोली मतदारसंघात मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नसल्याने त्यांच्या प्रचाराची मदार प्रामुख्याने कार्यकर्त्यावर आहे. त्यात भाजपकडे मुबलक नगरसेवक ऐरोली मतदारसंघात आहे आणि सात महिन्यावर येवू घातलेल्या महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक या प्रचाराच्या माध्यमातून आपला प्रभागातील जनाधार आजमावत असल्याने भाजपच्या पर्यायाने गणेश नाईकांच्या प्रचाराचा घरटी जोर वाढू लागला आहे. एकतर्फी लढतीमुळे ऐरोलीत भाजपा उमेदवार गणेश नाईकांना किमान लाळापेक्षा अधिक मताधिक्य मिळण्याची व लढत एकतर्फीच होण्याची चिन्हे प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात निर्माण झाली आहे.