मनसेचा बेलापूर विधानसभेसाठी “कर्तव्यनामा” प्रकाशित…
पत्रकारपरिषदेत मनसेने विजयाचा केला निर्धार
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे जाहीरनामे प्रकाशित होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे यांनी जनतेप्रती करणार असलेल्या कामाबद्दलची आपली कर्तव्य ही कर्तव्यनाम्याच्या स्वरुपात सादर केली. या कर्तव्यनामामध्ये पंचसूत्री कामांची मांडणी केली असून त्या प्रामुख्याने शिक्षण,आरोग्य सेवा ,घर जमीन,महिलांचे कल्याण व विकास, रोजगार व उद्योग या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.त्याच बरोबर विशेष महत्त्वाच्या कर्तव्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे,जसे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे भव्य शस्त्रसंग्रहालय,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ग्रंथालय व अभ्यासिका उभारणे प्रकल्पग्रस्तांचे नेते कै.दि.बा.पाटील यांचे नवी मुंबई मध्ये स्मारक व त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा म्हणून शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.तसेच नवी मुंबईत महारष्ट्रभवन उभारण्यात यावे,सुसज्ज एस.टी.डेपो उभारणे,पर्यटनाच्या दृष्टीने नवी मुंबईचा विकास व्हावा याकरिता फ्लामींगो दर्शन गार्डन,प्राणीसंग्रहालय,मत्सालय निर्मिती करण्यात येईल असे कर्तव्यनाम्यात सांगण्यात आले असल्याची माहिती शहर सचिव श्रीकांत माने यांनी दिली.
बेलापूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी सांगितले की प्रचाराच्या सुरवातीपासून आजपर्यंत जवळपास हजारो सोसायट्यांना भेटी दिल्या तसेच पायी प्रचारावर भर देत गावठाण भागातील ग्रामस्थ व तरुणांशी संवाद साधला, हजारो लोकांना हस्तांदोलन केली,त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मला विजयाचा मार्ग सुकर दिसत आहे असे सांगितले.स्थानिक आमदारांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे भाजपा व शिवसेना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नाराज गटांचा देखील मला पाठींबा असल्याचा दावा या प्रसंगी मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी केला.
स्थानिक भाजप उमेदवार यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यामध्ये नगरसेवकांनी करावयाच्या कामांचा जास्तीत जास्त उल्लेख केलेला आहे.आमदारांनी महाराष्ट्र भवनाची निर्मिती करण्याची घोषणा करून देखील आजतागायत सदर ठिकाणी एकही वीट रचली गेलेली नाही असे गजानन काळे यांनी सांगितले.नवी मुंबईतील ग्रामस्थांना FSI व PROPERTY कार्ड संबंधात खोटी आश्वासने भाजप उमेदवाराने जाहीरनाम्याद्वारे दिल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.भाजपच्या उमेदवाराच्या जाहिरनाम्यामधील आणखी एक हास्यास्पद बाब म्हणजे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये “आनंद निर्देशांक” सुधारणार असे देखील नमूद केले आहे.ज्याचे जाहीर स्पष्टीकरण लोकांना देण्याचे आव्हान मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत केले असल्याचे मत मनसेचे शहर सचिव विलास घोणे यांनी सांगितले.
आमच्या “कर्तव्यानामा” प्रकाशन सोहळ्यास मनसेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे,उपशहर अध्यक्ष संदीप गलगुडे,नितीन चव्हाण,शहर सचिव श्रीकांत माने,विलास घोणे,मनविसेचे अक्षय काशीद,सनप्रीत तुर्मेकर,संदेश डोंगरे,विभाग अध्यक्ष अमोल मापारी,योगेश शेटे उपस्थित होते.