सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ :navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : गेल्या एक महिन्यापासून नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे अधिकाधिक कर्मचारी निवडणूक कामात अडकल्याने शहरातील ठिकठिकाणी विखुरलेला कचरा, डेब्रिज, रॅबिट व पदपथावरील साहित्य उचलण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करूनही निवडणूकीमुळे कर्मचारीच नसल्याचे सांगत महापालिकेचे विभाग अधिकारी, उपायुक्तही आपली हतबलता व्यक्त करू लागले आहेत. निवडणूकीमुळे शहरातील बकालपणात वाढ होवू लागल्याने रहीवाशी पालिका प्रशासनाप्रती संताप व्यक्त करू लागले आहेत.
नेरूळ, सानपाडा, जुईनगर परिसराला बकालपणा आला असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. नेरूळ सेक्टर १६ ए परिसरातील भुखंड क्रं ६९ समोरील पदपथ आणि नेरूळ सेक्टर १८ येथील जय भवानी सोसायटीसमोरील पदपथावर गेल्या एक महिन्यापासून मातीचे व डेब्रिजचे ढिगारे व सुका कचरा, ओला कचरा याचे ढिगारे पडून आहेत. मागील काही दिवसापासून येथील रहीवाशांना पदपथाचा वापरही करता येत नाही. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहीवाशांना साथीच्या आजाराचाही सामना करावा लागत आहे. परिसराला बकालपणाचेही गालबोट लागले आहे.
नेरूळ सेक्टर १६, १८ येथील पदपथावर असलेले हे ढिगारे व कचरा हटविण्यासाठी भाजपच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या गेल्या पंचवीस दिवसापासून नेरूळ विभाग कार्यालयात चपला झिजवित आहेत. तोंडी सांगूनही दखल घेतली जात नसल्याने नगरसेविका रूपाली भगत यांनी विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करून डेब्रिज व कचरा हटविण्याची सतत मागणी केली आहे. तथापि आचारसंहितेमुळे निवडणूक कामात पालिका कर्मचारी व्यस्त असल्याने पालिका विभाग अधिकारी आपली हतबलता व्यक्त करत आहेत. निवडणूकीनंतर मतदान संपायची आपण वाट पाहत आहोत, आपणास कोणताही निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मांण करायचा नाही, परंतु मतदान संपताच आपण दोन दिवसात कचरा व ढिगारे न हटविल्यास तो कचरा व ढिगारे विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात नेवून पांगविणार असल्याचा संतप्त इशारा नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी दिला आहे.