सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ :navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने माथाडी घटकाचे प्रतिनिधी म्हणून गणेश शिंदेंना उमेदवारी दिली असली तरी कोपरखैराणे, घणसोली येथील माथाडींना मतदानासाठी गावी जावू लागल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तणावाखाली दिसू लागले आहेत. माथाडी उमेदवाराला मतदान करणारा माथाडीच मोठ्या संख्येने गावी जावू लागल्याने ऐरोलीतील व बेलापुरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकण्यास सुरूवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकाच दिवशी मतदान होणार असल्याने सर्वाधिक फटका नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा लढविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे. मागील निवडणूकांमध्ये राज्यात दोन ते तीन टप्प्यात मतदान होत असल्याने माथाडी घटक गावी मतदान करून नवी मुंबईतही मतदान करायला येत असे. यावेळी एकाच दिवशी सर्वत्र मतदान असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी मुंबईतील समीकरणे बिघडली आहेत. नवी मुंबईत कोपरखैराणे भागात माथाडी घटकाचे निवासी वास्तव्य प्रचंड असून त्याखालोखाल घणसोली, नेरूळ, ऐरोली, तुर्भे परिसरात माथाडी घटकाचे वास्तव्य आहे.
मतदानाच्या दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केट, धान्य मार्केट व किराणा दुकान मार्केटला जाहिरपणे सुट्टी देण्यात आल्याने माथाडींना गावी जाण्यास कोणतेही अडथळे राहीले नाहीत. भाजी मार्केट व फळ मार्केट सुरू असले तरी या मार्केटमध्ये माथाडींच्या नावाखाली बंगाली व उत्तर भारतीय घटक माल खाली करण्याचे व भरण्याचे काम करत असल्याने माथाडी गावी गेल्यामुळे या मार्केटच्या कामकाजावर कोणताही फारसा फरक जाणवणार नाही. त्यातच माथाडी संघटनेने लेखी पत्र देवून व्यापाऱ्यांना मतदानाच्या दिवशी ३ तास कामावर सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबईतील माथाडी घटक सातारच्या आपल्या गावाकडील उमेदवारांना मतदान करण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असतात. सातारानंतर पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील लोकांचे माथाडी म्हणून नवी मुंबईत मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर माथाडी नेते शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यांना त्यांच्याच मतदारसंघात अटीतटीची लढत असल्याने मतदारसंघात अडकून राहण्याची वेळ आली आहे.
माथाडी घटकांनी गावी मतदानासाठी यावे यासाठी नेहमीप्रमाणे ऐरोली विधानसभा मतदारसंघात बैठकांचे नियोजन गेल्या काही दिवसांपासूनच सुरू झाले होते. माथाडींची यादी गावाप्रमाणे बनविण्यात आली असून लक्झरी बसेसचेही नियोजन करण्यात आले होते. कोणत्या गावाला कोणत्या क्रमाकांची बस जाणार आहे याचीही जय्यत तयारी झाली असून ऐरोली मतदारसंघातील गणेश शिंदेंना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसणार आहे.
गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे अडथळे येवू नयेत, टोलनाक्यावर वाहने अडविली जावू नयेत, तसेच वाहन चौकशीच्या नावाखाली वाहने थांबविण्यात येवू नये यासाठी सातारच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘गनिमी कावा’ खेळत शनिवारी रात्रीच बसेसमधून मोठ्या प्रमाणावर माथाडींना मतदानासाठी गावी घेवून जाण्यात यशस्वी झाला आहे. घणसोली, ऐरोली, वाशी, तुर्भे, नेरूळ, जुईनगर परिसरातून बसेस शनिवारी रात्री उशिरा तसेच पहाटे माथाडी मतदारांना गावी घेवून गेल्या आहेत.
माथाडी कामगार हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हक्काचा मतदार मानला जात आहे. परंतु हा मतदारच गावी गेल्याने ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गणेश शिंदेंना मोठा फटका बसणार आहे. बेलापुरच्या तुलनेत ऐरोलीत माथाडी टक्का अधिक आहे.