सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रचाराच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात खरी झुंज पहावयास मिळत आहे. रोड शो, संपर्क अभियान यामध्ये भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरस असली तरी प्रचार साहित्य वितरणात मात्र बेलापुर विधानसभा मतदारसंघात मनसेच आघाडीवर असल्याचे अनेक प्रभागाप्रभागामध्ये पहावयास मिळत आहे.
गत विधानसभा निवडणूकीत मनसे नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघातून जेमतेम १० हजार मते मिळवू शकली नाही. त्यानंतर झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मनसे सहभागी न झाल्याने त्यांना स्थानिक भागातला जनाधार समजू शकला नाही. घणसोलीतील एका चमकेश पदाधिकाऱ्यांने पालिका निवडणूक लढविण्याचा उद्योगही केला. परंतु पालिकेत जितके प्रभाग तितकीच मते मिळाल्याने नवी मुंबईच्या राजकारणात या पदाधिकाऱ्याच्या जनाधाराचा आजही उपहासाने उल्लेख केला जात आहे.
भाजप व नव्याने कात टाकणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत मनसेच्या संघटनाबांधणीबाबत फारसे आशावादी चित्र नाही. काही पदाधिकारी समस्या निवारणासाठी पाठपुरावा करत असले तरी त्यांचा कल प्रसिध्दीकडेच अधिक असल्याने त्यातल्या काहींचा फेसबुकचे नगरसेवक असा उपहासाने उल्लेख होत आहे. सानपाड्यात मनसेचा जुना लढवय्या योगेश शेटे निर्णायक वेळी मनसेत सक्रिय झाल्याने त्या परिसरातून गजानन काळेंचा चांगले मतदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेरूळमध्ये गेल्या काही वर्षापासून अजय सुपेकरचे कार्य पाहता मराठीबहूल विभागात मनसेला मतदान मिळण्याची शक्यता आहे. बेलापुरात मनसेला मिळणाऱ्या मतदानावर आणि नेरूळमधील मतदानावर तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ५ वर्षात खऱ्या अर्थाने कितपत जनाधार मिळविला हे २४ तारखेला स्पष्ट होणार आहे. सिवूडस भागात सचिन कदम गेल्या काही वर्षापासून सिडको सदिनकाधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी नि:स्वार्थीपणे काम करत असून सचिन कदम प्रसिध्दीच्या मागेही धावत नाहीत.
सानपाडा, जुईनगरमध्ये भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेला चांगले मतदान होण्याचा अंदाज मराठी बहूल विभागात व्यक्त करण्यात येत आहे. मनसेकडे गजानन काळेंसारखा आंदोलनात्मक लढवय्या चेहरा निवडणूकीत असून प्रचारातील नियोजन गजानन काळेंचे अप्रतिम आहे. गजानन काळे अन्य उमेदवारांच्या तुलनेत प्रभावी असले व सुशिक्षित असले तरी पक्षबांधणी व कार्यकर्त्यांचे जाळे या निकषावर भाजप व राष्ट्रवादी मातब्बर असल्याचा फटका मनसेला बसत आहे.
घणसोली कॉलनीतून मनसेच्या निलेश बाणखिलेंना होणाऱ्या मतदानावर मनसेचे पदाधिकारी संदीप गलुगडे व नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसरातून होणाऱ्या मतदानावर सविनय म्हात्रेंची आणि बेलापुर नोडमध्ये होणाऱ्या मतदानावर नितीन चव्हाण यांची जनसामान्यातील पत समजण्यास गजानन काळेंना मदत होईल. पाच वर्षात फेसबुकवर चमकेशगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचाही जनाधार २४ तारखेला समजण्यास मनसेला मदत होईल.
मनसेसुप्रिमो राज ठाकरेंची नेरूळमध्ये अंतिम टप्प्यात सभा आल्याने या सभेतून मिळणाऱ्या नवसंजीवनीवरच गजानन काळेंच्या मताधिक्क्यात चांगली वाढ होणार असल्याचा आशावाद मनसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.