श्रीकांत पिंगळे : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राज्यात अजून सत्तास्थापनेचा तिढा संपलेला नाही. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेली आहे आणि भाजपा शिवसेनेला तुर्तास मंत्रिपद देण्यास तयार नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तास्थापनेतील शिवसेना-भाजपामधील कलगीतुरा लांबून पाहत आहेत. एकीकडे मंत्रालयात सत्ता स्थापनेचा वाद कायम आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची मुंबईवारी लांबणीवर पडलेली आहे. नवी मुंबई शहरामधील सोशल मिडियावरील चावडी गप्पांमध्ये मात्र ताई-दादांच्या (सौ. मंदाताई म्हात्रे आणि गणेश नाईक) संभाव्य मंत्रिपदाच्या गप्पा मात्र जोरात रंगू लागल्या आहेत.
नवी मुंबई शहरातील सोशल मिडिया हा राजकीय गप्पांचा चावडी कट्टा झाला आहे. अन्य मातब्बर राजकारणी या सोशल मिडियापासून लांब असल्या तरी बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या सोशल मिडियावर कमालीच्या सक्रिय आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांचा नगरसेवकांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी व अन्य घटकांशी जवळचा संबंध आलेला आहे. मंदाताई म्हात्रे या सोशल मिडियातील चर्चेत सहभागी होत असल्याने नवी मुंबईतील अन्य राजकारण्यांच्या तुलनेत त्यांना नवी मुंबईतील समस्यांचा, बदलत्या वाऱ्याचा व लोकांच्या मानसिकतेचा अंदाज लवकर बांधणे शक्य झालेले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप हे तीन पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, मित्र परिवार सोशल मिडियावर कमालीचा सक्रिय व आक्रमकही आहे. कॉंग्रेसचे मातब्बर स्थानिक पातळीवरील नेते व नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत व अन्य तीन-चार जणांचा अपवाद वगळता कॉग्रेसचे सोशल मिडियावर फारसे अस्तित्व पहावयास मिळत नाही. विधानसभा निवडणूकीअगोदर नाईक परिवार, त्यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपवासी झाल्यावर सोशल मिडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बाजू लंगडी पडली आहे. कॉंग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीचे सोशल मिडियावरील अस्तित्व केविलवाणे होवून बसले आहे.विधानसभा निवडणूक निकालानंतर नवी मुंबईच्या सोशल मिडियामध्ये गणेश नाईक (दादा) व सौ. मंदाताई म्हात्रेंच्या संभाव्य मंत्रिपदाच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. पैंजाही झडू लागल्या आहेत. विधानभवनातील कामकाजाचा गणेश नाईकांना मंदाताईपेक्षा अनुभव दांडगा आहे. गणेश नाईक पाचव्यांदा विधानसभेत गेले आहेत. त्यांना मंत्रिपदाचाही अनुभव आहे. मंदाताई म्हात्रे या सलग दुसऱ्यांदा विधानसभेत गेल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीतून त्यांनी सहा वर्षे विधान परिषद गाजविली आहे. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षपदही त्यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. मंदा म्हात्रे व गणेश नाईक समर्थक सोशल मिडियावर फारशी चर्चा करत नसले तरी शिवसेनेचे काही घटक सोशल मिडियावर चर्चा करताना म्हात्रे व नाईक समर्थकांमध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्नही करत आहेत.