अॅड. महेश जाधव : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे भाजपचेच गणेश नाईक व मंदाताई म्हात्रे हे दोन आमदार निवडून आले. ऐरोलीच्या तुलनेत बेलापुरात भाजपाचे मताधिक्य कमी असल्याने ही बाब बेलापुर भाजपातील काही रथी-महारथींच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळे महायुतीतील ‘बिभीषणां’चा शोध घेण्याची मोहीम पडद्याआडून सुरू झालेली आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या एका युवा नगरसेवकाने त्याच्या व शेजारच्या मतदारसंघात खुलेआमपणे घड्याळाचे काम केल्याच्या घडामोडी आता पुढे येवू लागल्या आहेत. अवघ्या सहा महिन्यावर आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना-भाजपा युती झाल्यास या शिवसेनेच्या युवा नगरसेवकाचा भाजपकडून शंभर टक्के ‘किरिट सोमैय्या’ होणार असल्याची चर्चा शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षामध्ये सुरू झालेली आहे.
किरिट सोमैय्या यांनी खासदारकीच्या काळात सतत शिवसेनेला अडचणीत आणण्याची व शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याचा एककलमी उद्योग राबविला होता. विविध आरोप करत थेट मातोश्रीला टार्गेट करण्याचे धाडस किरिट सोमैय्याने दाखविले होते. लोकसभा निवडणूकीत भाजपाबरोबर युती करताना शिवसेनेने किरिट सोमैय्याचे तिकिट भाजपाला कापायला लावून आपला मागील पाच वर्षातील राजकीय हिशोब चुकता करायला लावला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत बेलापुर विधानसभा निवडणूकीत हतबल असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला व फारसा जनाधार नसलेल्या मनसेने अनपेक्षितरित्या मुसंडी मारल्याने राजकीय समीकरणात उलथापालथ झाली आणि भाजपच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अपेक्षित मताधिक्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे विजयापेक्षाही ऐरोलीच्या तुलनेत कमी मिळालेले मताधिक्य ही बाब बेलापुर भाजपातील अनेकांच्या जिव्हारी लागल्याने महायुती असतानाही कोणाकोणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा व मनसेचा पुळका आला होता याचा शोध घ्यावयास संबंधितांनी सुरू केला आहे.
निवडणूक कालावधीत शिवसेनेच्या अनेकांनी मनसेचे काम केल्याचे हळूहळू पडद्याआडच्या कबुलीजबाबात उघडकीस येवू लागले आहे. युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणाचे काम करायचे याचा संदेश कोणी पाठविला हेही आता उघडकीस येवू लागले आहे. त्यातच शिवसेनेच्या बेलापुरातील एका युवा नगरसेवकाने स्वत:च्या तसेच बाजूच्या प्रभागात खुलेआमपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्यायाने अशोक गावडेंचे काम केल्याचे आता स्पष्ट होवु लागले आहे. त्या नगरसेवकाच्या व शेजारच्या प्रभागाचा भाजपच्या संबंधितांनी कानोसा घेतला असता स्थानिक रहीवाशांकडूनच त्या संशयाला दुजोरा दिला जावू लागल्याने शिवसेनेच्या घड्याळप्रेमी युवा नगरसेवकाच्या आगामी राजकिय वाटचालीवर आता अडथळ्यांचेच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या हा युवा नगरसेवक मागील काही महिन्यापूर्वी त्याच्या वाचाळपणामुळे अडचणीत आला होता. या गोष्टीची मातोश्रीवर तसेच शिवसेना भवनवरही गंभीर दखल घेण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेतीलच मातब्बर सूत्रांकडून दिला जात आहे. आपण मुंबईतील एका टॉपच्या शिवसेना युवा नेत्यासोबत रात्री ‘अवषध’ घेत असल्याची फुशारकी आपल्या प्रभागातील काही लोकांसमोर मारली होती. त्यांनी ही घटना योग्य ठिकाणी पोहोचविताच मातोश्री व शिवसेना भवनशी जवळीक असणाऱ्या ऐरोली मतदारसंघातील शिवसेनेच्या दुसऱ्या युवा नगरसेवकापर्यत पोहोचविली. दुसरीकडून ही घटना मातोश्री व शिवसेना भवनवरही पोहोचली. ऐरोलीच्या संबंधित युवा नगरसेवकांने ‘अवषध’ वल्गना करणाऱ्या शिवसेनेच्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाची चांगल्याच भाषेत कानउघडणी केली. शिवसेनेने या ‘अवषध’ प्रेमी वाचाळ नगरसेवकाच्या वल्गनेची घेतलेली गंभीर दखल व भाजपला त्या नगरसेवकाचे प्रचारातील घड्याळप्रेमाचे स्थानिक भागात मिळालेले पुरावे यामुळे बेलापुरातील संबंधित शिवसेनेच्या युवा नगरसेवकाच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे ‘अवषध’ वल्गनेमुळे असलेली गंभीर नोंद आणि भाजपचा रोष पाहता या नगरसेवकाला सहा महिन्यानी येवू घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत हाताला घड्याळच बांधावे लागणार असल्याचे उपहासाने बोलले जावू लागले आहे.