अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा परिसरात अनधिकृतरित्या परप्रातिंय मच्छि विक्री करत असून यामुळे ग्रामस्थ मच्छिमारांवर अन्याय होत असल्याचे सांगत मनसे सानपाडा पामबीच विभागाचे अध्यक्ष योगेश शेटे यांनी तात्काळ या परप्रातिंय मच्छिविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. पालिकेने या मागणीची तात्काळ दखल घेत सानपाडा येथे अनधिकृतरित्या मच्छि विक्री करणाऱ्या परप्रातिंयावर अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
अनधिकृत परप्रांतीय मासे
विक्रेत्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली सोमवारी
बघायला मिळाली. अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या विरोधात स्थानिक
भूमिपुत्र असलेल्या मासे विक्रेत्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने
सोमवारी महापालिकेला दिला.
गेल्या काही महिन्यांपासून सानपाडा – पामबीच विभागामध्ये रस्त्यासह पदपथावर
अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे.
शिवाजीनगर, मानखुर्द येथून मोठ्या संख्येने अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांचा
येथे दिवसेंदिवस वावर वाढतच चालला आहे. हे अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेते
निकृष्ट दर्जाची मासळी येथे कमी बाजारभावात विकत असल्याने येथील नागरिकांच्या
आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे
सोनसाखळी चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये देखील वाढ होण्यास
सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर
आला आहे. अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे येथील स्थानिक भूमिपुत्र
असलेल्या मासेमारांचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मासे विक्रीचा पारंपरिक
व्यवसाय धोक्यात आला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक
नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या
विरोधात मनसेने महापालिका तुर्भे ‘ड’ विभाग कार्यलयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग
अधिकारी समीर जाधव यांना लेखी पत्र देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
महापालिकेने येत्या ७ दिवसांत अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कायदेशीर
कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊन स्थानिक भूमिपुत्र असलेल्या मासे
विक्रेत्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी
महापालिकेला दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी, मनसेचे उपविभाग अध्यक्ष
देवेंद्र पिल्ले, शाखा अध्यक्ष अमन गोळे, महाराष्ट्र सैनिक सुनंदा दळवी, सायली
पवार, श्रीकांत आतकरी, विवेक कदम उपस्थित होते.
पालिकेने कारवाई न केल्यास मनसे स्थानिक भूमीपुत्रांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनसेचे सानपाडा पामबीच विभाग अध्यक्ष योगेश शेटेंनी देताच पालिका प्रशासनाला जाग आली आणि कारवाईला सुरूवात झाली. सानपाड्यातील अन्य पक्षाचे पदाधिकारी परप्रातिंय मच्छि विक्री करणाऱ्यांविरोधात आजवर केवळ बघ्याची भूमिका घेत होते, त्यांना जे जमले नाही ते मनसेच्या योगेश शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखविले असल्याची प्रतिक्रिया सानपाडा नोडमधील रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.