अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळमध्ये रेल्वे रूळावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या पुर्नबांधणीच्या घटनेने वेगळे वळण घेतले असून यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पादचारी पुलाच्या पुर्नबांधणीबाबत जनतेच्या माहितीस्तव लावलेल्या बॅनरवर शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या छायाचित्रावर रात्रीच्या अंधारात भ्याड कृत्य करून छायाचित्र विचित्र करण्याचा प्रकार समाजकंठकांनी केला आहे. महिला नगरसेविकेच्या बॅनरबाबत करण्यात आलेल्या प्रकाराविषयी नेरूळ नोडमधील महिलांकडून आता उघडपणे संताप व्यक्त होवू लागला आहे.
रेल्वे रूळावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या दुरावस्थेबाबतची समस्या तत्कालीन शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे सातत्याने महापालिका, सिडको व रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनीही याबाबत सभागृहाचे लक्ष वेधत समस्येचे गांभीर्य महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तथापि लाल फितीच्या कारभारात आणि या पादचारी पुलाच्या डागडूजीबाबत रेल्वे, महापालिका, सिडको यांनी सातत्याने टोलवाटोलवी केली. तब्बल तीन वेळा स्थानिक नागरिकांसमवेत नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी त्या त्या पालिका आयुक्तांची भेट घेत समस्या निदर्शनास आणून देत या पादचारी पुलाची डागडूजी करा अन्यथा नव्याने बांधा ही मागणी सातत्याने लावून धरली. खासदार राजन विचारे यांनीही या पुलाबाबत रेल्वे प्रशासनाला पादचारी पुलाची समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते.
पादचारी पुलाच्या डागडूजीस ३० लाखाचा खर्च होता. हा खर्च महापालिकेने द्यावा अशी स्पष्ट भूमिका रेल्वेने घेतली. हा निधी महापालिकेने तात्काळ द्यावा यासाठीही महापालिका दरबारी पाठपुरावा करत कधी नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तर सातत्याने लेखी निवेदने, तक्रारी सादर करत समस्येचे गांभीर्य संबंधितांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. रेल्वे रूळावरील पादचारी पुलाच्या समस्या निवारणासाठीचा निर्णय रेल्वे, सिडको व महापालिका या प्रशासकीय त्रिकोणात येत असल्याने कालावधी जात होता, तरीही नगरसेविका सुनिता रतन मांडवे सातत्याने पाठपुरावा करतच होत्या. महापालिका सभागृहात पादचारी पुलाच्या डागडूजीसाठी रेल्वेला निधी देण्याचा ठराव मंजुर झाला आणि त्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची आचारसंहिता लागली. आचारसंहिता संपताच रेल्वे रूळावरील पादचारी पुलावरील डागडूजीसाठी निधी लवकरात लवकर न दिल्यास ४८ तासानंतर आपण आयुक्त दालनात दररोज ठिय्या आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन आयुक्तांना सादर केले.
नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या सिडको, महापालिका, रेल्वेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पादचारी पुलाच्या डागडूजीची समस्या अखेर मार्गी लागली. याबाबत स्थानिक जनतेला माहिती देण्यासाठी लागलेल्या बॅनरची मंगळवारी रात्री अंधाराचा फायदा घेत काही समाजकंठकांनी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांचे छायाचित्र विद्रुप करण्याचा भ्याड प्रकार केला. पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका मांडवे यांच्या बॅनरबाबत करण्यात आलेल्या भ्याड कृत्याची आज नेरूळ नोडमध्ये चर्चा सुरू असून महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.