श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीस अजून जवळपास साडेपाच महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून गेलेल्या अनेक नगरसेवकांच्या मनात आपली तिकिट कापली जाण्याची भीती आहे. भाजपा जर त्यांच्या विद्यमान आमदार-खासदारांची तिकिट कापू शकते तर आपलीही तिकिट कापण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे भाजपात नव्याने दाखल झालेल्या नगरसेवकांकडून खासगीत बोलले जावू लागले आहे.
लोकनेते गणेश नाईक हे बेलापुर विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार गणले जात होते. तथापि भाजपाने त्यांना तिकिट न देता आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंवरच विश्वास दाखवित त्यांना पुन्हा आमदार होण्याची संधी दिली. जर राजकारणात प्रबळ मानल्या जाणाऱ्या महारथी गणेश नाईकांना तिकिट भेटली नाही तर आपणासही भेटेल कशावरून असा प्रश्न भाजपातील बुद्रुक गटाचे नगरसेवक खासगीत एकमेकांना विचारू लागले आहेत.
स्वच्छ नगरसेवकांना तिकिट देण्याची तसेच भ्रष्टाचारी आणि कमिशनबाज प्रतिमा असणाऱ्या नगरसेवकांना तिकिट डावलण्याचा प्रकार भाजपाने यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकांमध्ये तिकिट वाटपात केला होता. भाजपाशी संलग्न असलेल्या अनेक संघटना, संघ परिवार नगरसेवकांच्या कामकाजाचा व पक्षसंघटनेतील सहभागाचा वेळोवेळी आढावा घेत होते. यापूर्वी गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना काही तीन-चार जागांचा अपवाद वगळता उर्वरित जागांवर ते म्हणतील त्याला पालिका तिकिट हा रिवाज असल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिला आहे. परंतु भाजपात हा प्रकार चालणार नसल्यानेच आपली तिकिट कदाचित कापली जाण्याची भीती नगरसेवकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या अनेक नगरसेवकांची भाजपा संलग्न संस्थांनी तटस्थपणे चौकशी करून अहवालही बनविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही मातब्बर नगरसेवकांच्या प्रभागात कमिशनच्या व निकृष्ठ दर्जाच्या विकासकामांविषयी मंत्रालयात आलेल्या तक्रारींची दखलही भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर घेण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा ठपका असलेल्या व न्यायालयात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित नगरसेवकांना भाजपा तिकिट देणार नसल्याचे आता लवकरच स्पष्ट होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
अनेक नगरसेवक ठेकेदारांच्या हातातले बाहूले बनले असून केवळ कमिशनपुरताच त्यांचा विकासकामाशी संबंध राहीला आहे, निकृष्ठ दर्जाची विकासकामे, अर्धवट कामे करूनही ठेकेदारांनी बिले घेणे व याकडे नगरसेवकांनी कानाडोळा करणे याची मंत्रालयात आलेल्या तक्रारअर्जाची संघटनात्मक पातळीवर दखल घेण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच राष्ट्रवादीतून भाजपात नगरसेवक येण्यापूर्वी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या कामाकडेही पक्ष कानाडोळा करून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराकडून कमिशन घेवून विकासकामांमकडे व विकासकामांच्या दर्जाकडे कानाडोळा केलेल्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांना भाजपा नारळ देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नवी मुंबईत दोन विधानसभा मतदारसंघ येत असून तिकिट वाटपात बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे उद्या भाजपाने तिकिट नाकारल्यास शिवसेना व राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा मानस काही नगरसेवकांकडून व्यक्त केला जात आहे.