नवी मुंबई : अनंतकुमार गवई
केंद्र सरकारच्या जैवविविधता कायद्यास अनुसरून महाराष्ट्र जैवविविधता नियम 2008 तयार करण्यात आले आहेत. त्यास अनुसरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जैवविविधता समिती स्थापन करावयाची असून नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेने निश्चित केल्यानुसार 7 सदस्यीय जैवविविधता समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रथम बैठकीप्रसंगी स्विकृत नगरसेवक श्री. अनंत लक्ष्मण सुतार यांची जैवविविधता समितीच्या अध्यक्षपदासाठी बहुमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षांचे महापौर महोदयांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी समिती सदस्य नेत्रा शिर्के, सुरज पाटील व ज्ञानेश्वर सुतार आणि समितीचे सदस्य सचिव अनिल नेरपगार उपस्थित होते. या जैवविविधता समितीमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पर्यावरणशील इको सिटी स्वरूपातील विकासासाठी नियोजनबध्द काम केले जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत सुतार यांनी सांगितले.