स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ च्या अनुषंगाने सिटी प्रोफाईल मधील ठिकाणांना भेटी देत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोपरखैरणे व घणसोली विभागातील स्वच्छताविषयक बाबींची संबंधित अधिकाऱ्यांसह बारकाईने पाहणी करीत मौलिक सूचना केल्या व अधिक उत्तम स्वच्छता राखण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
कोपरखैरणे विभागातील समतानगर, सेक्टर १४ चे निवासी क्षेत्र, वाशी कोपरखैरणे मुख्य रस्त्यावरील वाणिज्य क्षेत्र, सेक्टर १९ चा धारण तलाव तसेच सेक्टर ११ चा भाग याठिकाणी भेटी देऊन आयुक्तांनी स्वच्छता व सुशोभिकरण या अनुषंगाने पाहणी केली. तलावाचा जलाशय अधिक स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी विभागातील काही दुर्लक्षित जागांवर सुशोभिकरण करून त्यांचा आकर्षक कायापालट करण्याचे निर्देश दिले.
घणसोली विभागातही पामबीच मार्गावरील स्वच्छताविषयक पाहणी करीत आयुक्तांनी दुभाजकांमध्ये हिरवळ लावण्याचे निर्देशित केले तसेच तळवलीगांव व परिसर सेक्टर ६ चा परिसर याठिकाणी पाहणी करीत स्वच्छतेच्या अनुषंगाने नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.
स्वच्छता ही केवळ अभियानापुरती करण्याची गोष्ट नसून अभियानकाळात स्वच्छता कार्याला लाभलेली गती नियमित रहावी व स्वच्छता ही प्रत्येकाची सवय व्हावी या भूमिकेतून काम करावे असे निर्देशित करतानाच आपल्या शहराला देशात नंबर वन बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सर्वोत्तम प्रतिक्रिया आणि प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.