नागरी समस्यां संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
नवी मुंबई – नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर, तुर्भे विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सानपाडा सेक्टर १० येथील महापालिकेच्या तुर्भे ‘ड’ विभाग कार्यालयावर शुक्रवारी घंटानाद मोर्चा काढला. सदर मोर्चाची सुरवात सानपाडा सेक्टर ८ येथील श्री गणेश मंदिरात गणपती बाप्पाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढाच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी समीर जाधव यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात “या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वरती पाय..”, “परत करा आमचे फुटपाथ, नका करू हाथ साफ…”, “श्रीमंत आमची पालिका, मग रस्त्यांचे हाल का ?….”, “पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…..”, “बंद करा भ्रष्टाचार फुटपाथ वर आमचा अधिकार….” या घोषणा देऊन मनसैनिकांनी घंटानाद करून परिसर दणाणून सोडला.
गेल्या कित्येक दिवसांपासून विभागातील नागरिकांना विविध समस्यांनी पछाडले आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पहावयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची व मैदानांची झालेली दुरावस्था, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या नागरी समस्यांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे देखील असल्याची शंका मनसेने व्यक्त केली आहे. तरी या समस्या येत्या दहा दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
याप्रसंगी मनसेची आक्रमकता पाहून विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, शहर सहसचिव दिनेश पाटील, सुरेश मढवी, सचिन कदम, विनय कांबळे, अमोल इंगोले, वाहतूक सेनेचे नितीन खानविलकर, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, दीपाली ढऊल, शहर सचिव यशोदा खेडसकर, लीना पाखरे, सायली कांबळे, आनंद चौगुले, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, प्रवीण वाघमारे, अनिकेत भोपी, देवा प्रसाद, अक्षय भोसले, मयूर चव्हाण, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, संजय पाटील, संजय खंडागळे, संकेत पाटील, दत्ता वऱ्हाडी, शाखा अध्यक्ष अमन गोळे, नितीन पाटील, विशाल नागरसे, मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, शहर सचिव अमित पाटील, उपविभाग अध्यक्ष श्रीकांत आतकरी, प्रदीप संकपाळ, शांताराम होले, वैभव झिमन, बाळा पाटील, प्रशांत ठाकूर, संकेत वासकर, सुरज ठाकूर, सुशांत काळसेकर, विभाग अध्यक्षा शितल मोरे, सुनंदा दळवी, उपविभाग अध्यक्षा विद्या इनामदार, सायली पवार, शाखा अध्यक्षा पपिया दंदोपात, जयश्री जाधव, सविता शिंदे यांसह ३०० कार्यकर्ते मोरच्यात सहभागी झाले होते.