अनंतकुमार गवई
नवी मुंबई मार्च महिन्यात होणार्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पामबीच मार्गावर खाडीअंतर्गत भागात असणार्या बामणदेव मार्ग परिसरात कोलवाणी मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी 13 जानेवारी रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सवार्ंनी सहभाग घ्यावा असे आवाहन कोलवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी केले आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिनी बामणदेवाचा भंडारा सारसोळे गावच्या कोलवाणी माता मित्र मंडळ ाच्या माध्यमातून सारसोळेचे ग्रामस्थ आयोजित करत असतात. सारसोळेच्या खाडीअंतर्गत भागात बामणदेवाचे मंदिर असून बामनदेव हे सारसोळे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. मासेमारीसाठी खाडीत गेल्यावर तसेच खाडी परिसरात वावरताना बामनदेवच आपले रक्षण करतो, अशी या ग्रामस्थांची धारणा आहे. गेल्या अनेक वर्षापासून सारसोळेतील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेचे ग्रामस्थ बामणदेवाचा भंडारा आयोजित करतात. बामणदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चा व खाचखळग्यांचा आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जंगली झुडूपे व गवत उगवते. त्यामुळे या मार्गावरून जाणे अशक्य होते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भंडारा साजरा करण्यापूर्वी या मार्गाची सारसोळे ग्रामस्थ सफाई करत असतात.
यंदाही 13 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3ः00 वाजता स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सवार्ंनी सहभाग दर्शवावा असे आवाहन कोलवानी मित्र मंडळ, सारसोळे गाव व ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी केले आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ही बामणदेव मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये वनविभागाचे कर्मचारी, पालिका कर्मचारी, शालेय शिक्षक, नगरसेवक, माजी नगरसेवक, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, पालिका प्रभाग समिती सदस्य, सारसोळेचे ग्रामस्थ, नेरूळ सेक्टर 6 चे रहीवाशी, रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी व रिक्षाचालक आणि बालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.