नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुका कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची शक्यता असतानाच महापालिका प्रभाग ८७ मध्ये उद्यानातील कामाचे श्रेय शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांना जावू नये म्हणून काही समाजकंठकांकडून उद्यानाची नासधुस करून उद्यान बकाल करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. याप्रकरणी नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांनी उद्यानाची होत असलेली नासधुस व आणला जात असलेला बकालपणा याबाबत पालिका प्रशासनाकडे केली असून लवकरात लवकर संबंधितांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेरूळ नोडमधील सेक्टर ८ परिसरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान हे विस्तीर्ण उद्यान असून मागील १० वर्षात मांडवे परिवाराने पालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करून उद्यानाचा कायापालट केला आहे. उद्यानातील सुविधा व खेळणी तसेच सुशोभीकरण यामुळे नेरूळ नोडमधील सर्वाधिक आकर्षक व चर्चित असे हे उद्यान आहे. नेरूळ नोडमधील रहीवाशांची या उद्यानात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यत गर्दी असते. या उद्यानातील सुविधांमुळे नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे ब त्यापूर्वीचे नगरसेवक रतन नामदेव मांडवे नेरूळकरांच्या प्रशंसेस पात्र ठरले आहेत.
उद्यानाच्या कामाच्या बळावर मांडवे परिवाराला मतदान होत असल्याचा ग्रह करून काही समाजकंठकांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून उद्यानाची नासधूस करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला. एल मार्केटलगत असलेले उद्यानाचे प्रवेशद्वारे तोडण्यात आले आहे. उद्यानात असलेल्या स्पीकरची तोडफोड करून वायरीही तोडण्यात आल्या अहोत. त्यातच उद्यानात सुशोभीकरण वाढवणारे नवीन वॉल पेण्टींगची वाताहत करण्यात आली असून तिथेही विद्रुपीकरण करण्याचा उद्योग सुरू झाला आहे.
निवडणूकीची आचारसंहिता काही वेळातच लागण्याची दाट शक्यता असताना मांडवे परिवाराने परिश्रमपूर्वक उद्यानाचा कायापालट केला असल्याने उद्यानात बकालपणा व समस्या निर्माण करून मांडवे परिवाराच्या परिश्रमाला गालबोट लावून जनसामान्यात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार सूडबुध्दीने काही समाजकंठकांनी सुरू केला आहे. याप्रकरणी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून संबंधितांचा शोध घेवून महापालिका मालमत्तेची नासधुस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राजकीय सुडबुध्दीने मांडवे परिवाराची प्रतिमा मलीन करण्यासाठी समाजकंठकांनी उद्यानाची नासधुस सुरू केल्याने जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मांडवे परिवाराप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे.