मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात दोन महिन्यांपासून सातत्याने कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असून सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल ३५ डॉलरपेक्षा खाली आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याऐवजी उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवणारे केंद्रातील सुटाबुटातले लुटारु सरकार आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
थोरात पुढे म्हणाले की, कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये झालेली घट ही ऐतिहासिक आहे, १९९१ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात किंमत कमी होण्याची हि पहिलीच वेळ आहे. आता पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करुन मोदी सरकार सामान्य जनतेला त्याचा लाभ देईल अशी आशा असताना उलट उत्पादन शुल्कात ३ रुपयांची वाढ करुन मोदी सरकारने लूटमार करण्याचा उद्योग केला आहे. आधीच सामान्य जनता महागाईने होरपळलेली आहे, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या असत्या तर त्याचा महागाई कमी होण्यासही हातभार लागला असता.
डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना कच्च्या तेलाच्या किमती १४३ डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहचल्या होत्या त्यानंतर १२० डॉलरवर त्या स्थिरावल्या त्यावेळी पेट्रोल प्रती लिटर ७३ रुपये होते. आताचे सत्ताधारी भाजपचे नेते त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात म्हणून देशभर आंदोलन करत होते. आता कच्च्या तेलाच्या किमती व पेट्रोलचे दर पाहता मोठी तफावत दिसते. आज पेट्रोल प्रती लिटर ७५ रुपयापर्यंत आहे. कच्च्या तेलाच्या किमती विचारात घेता किमान १० रुपयाने त्या कमी करता आल्या असत्या पण या सामान्य जनतेला लाभ व्हावा अशी मानसिकताच या सरकारची नाही, असेही थोरात म्हणाले.