नवी मुंबई : महानगर गॅसने घरगुती गॅस देयक भरण्याबाबत नेरूळ पश्चिमेला केंद्र उघडणेबाबत व अन्य समस्यांचे निवारण करण्यासाठी सारसोळे गावातील युवा ग्रामस्थ व गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी सानपाडा-तुर्भे येथील महानगर गॅसच्या कार्यालयात जावून निवेदन सादर केले व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना गॅसविषयक भेडसावणाऱ्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी केली.
महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिनीच्या (पाईप) माध्यमातून थेट स्वयंपाकघरात गॅस उपलब्ध झाल्याने गॅससाठी नंबर लावा, गॅस घेवून कोणी येईपर्यत घरीच थांबा आदी समस्यांचे निवारण झाले, याबाबत सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करताना मनोज मेहेर यांनी आपणाकडून दर दोन महिन्याने आपल्या गॅस वापराचे देयक येते. मात्र अनेकदा ते देयकही विलंबाने येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून आमच्याकडे येत आहे. आपला माणूस गॅस किती वापरला याचे छायाचित्र काढण्यासाठी वेळेवर येत नसल्याने अनेकदा सरासरीचे व अंदाजाने बिल पाठविले जात असल्याने ग्राहकांत नाराजी आहे. नेरूळ नोडमधील (शेजारील जुईनगर धरता) आपल्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वानाच देयक भरण्यासाठी तुर्भेला (सानपाडा) येणे शक्य नाही. आपण नेरूळ नोडमध्ये आपल्या गॅस देयक संकलन केंद्र उघडल्यास ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल असे महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान समजावून सांगितले.
गॅसचे देयक सरासरी न पाठविता अचूक पाठविणे, वापरलेल्या गॅसची माहिती घेण्यासाठी छायाचित्र काढण्याकरिता माणूस वेळेवर पाठविणे तसेच नेरूळ नोडमध्ये गॅस देयक संकलन केंद्र कार्यान्वित करणे या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.