नवी मुंबईतील करदात्यांचे ४०ते५०लाख शिक्षण विभागाने घातले इमॅजिका वाटरपार्कच्या पाण्यात ! !
नवी मुंबई : विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक गोष्टींचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी दरवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते,परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला या सर्व गोष्टींचा विसर पडला असून मौजमजेसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले असून त्यासाठी नागरिकांच्या करातील ४०ते५० लाखांचा चुराडा शिक्षण विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी उजेडात आणला आहे. दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी कारदात्यांच्या पैशातून राखीव निधीची तरतूद करण्यात येते.परंतु यावर्षी कुठल्याही ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणी सहल न नेता पालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खोपोली येथील इमॅजिका वॉटरपार्क येथे सहलीसाठी नेण्यात आले.गंभीर बाब म्हणजे मौजमजेच्या ठिकाणी सहलीसाठी ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला असून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.दिनांक ०३-०२-२०२० ते ०६-०२-२०२० या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील इयत्ता ९ व १० वीच्या जवळपास ५००० विद्यार्थ्यांची सहल इमॅजिका वॉटरपार्क येथे आयोजित करण्यात आली होती.तसेच या सहलीचा आनंद पालिकेतील काही शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कुटुंबीयांनीही लुटला असल्याचे समोर आले आहे. तसेच या सहलीच्या आयोजनात शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी केला आहे.सदरचे प्रकरण गंभीर असून मौजमजेच्या ठिकाणी सहल आयोजित करून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि या गैरप्रकारांत दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, सनप्रीत तुर्मेकर, निखिल गावडे यांनी केली आहे.