स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मार्च महिन्याची १२ तारीख उलटली तरी मूषक नियत्रंण कामगारांचा जानेवारी महिन्याचा पगार न होणे, गेली वर्षभर सफाई कामगारांच्या खात्यात पीएफ जमा न होणे यामुळे ठेकेदाराच्या माध्यमातून कामगारांचे शोषण होत असतानाही महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या कामगारांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सारसोळे गावचे भुमीपुत्र व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी लेखी निवेदनातून पालिका प्रशासनाला दिला आहे.
नेरूळ नोडमध्ये रस्ते सफाई, गटारांची स्वच्छता आदी कामे सफाई कामगारांकडून करण्यात येत आहेत. याच सफाई कामगारांच्या बळाबर नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्य सरकारचा सलग दोन वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळालेला आहे. श्रेय सफाई कामगारांचे आणि पुरस्कार घ्यायला मात्र राजकारणी आणि पालिका अधिकारी. किती विरोधाभास आहे हा. नेरूळ नोडमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांचा पीएफ गेल्या एक वर्षापासून भरण्यात आलेला नसल्याच्या तक्रारी सफाई कामगारांनी आमच्याकडे केल्या आहेत. वेतनातून सफाई कामगारांचा पीफ कापला जात असतानाही पीफ भरला न जाणे हा आजच्या काळात अक्षम्य गुन्हा आहे. मोदी सरकार आल्यापासून एमआयडीसीतही कामगारांचे पीएफ न चुकता आज वेळेवर भरला जात आहे. मात्र महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या सफाई कामगारांचा वर्षभर पीफ जमा केला जात नसेल तर ती खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. महापालिका कामगारांसाठी कार्यरत आहे का ठेकेदाराचा स्वार्थ साधण्यासाठी, याचे महापालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर उत्तर अपेक्षित आहे. नेरूळ नोडमधील सफाई कामगार सातत्याने पीफ न भरल्याच्या तक्रारी आमच्याकडे करत आहेत. ही गंभीर समस्या तात्काळ पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावी. पालिका प्रशासनाला आम्ही ८ दिवसाचा वेळ देत आहोत. २० मार्चपर्यत कामगारांचा पीफ भरला न गेल्यास व कोणत्याही हालचाली न झाल्यास आम्ही मा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मा. मुख्यमंत्री व मा. नगरविकास राज्यमंत्री, कामगार मंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवू. समस्येचे गांभीर्य पाहता आपण नेरूळ नोडमधील सफाई कामगारांच्या थकीत फीएफ प्रकरणी पालिका आयुक्तांशी चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कामगारांची या जाचातून लवकरात लवकर मुक्तता करावी, अशी मागणी मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
मुषक नियत्रंण कामगारांच्या समस्येवरही प्रकाशझोत टाकताना निवेदनातून मनोज मेहेर यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई महापालिका प्रशासनात मूषक नियत्रंण विभागात आजमितीला ७६ कामगार काम करत आहेत. नवी मुंबईतील दिघा ते बेलापुर दरम्यान आपण सकाळी तसेच मध्यरात्रीही हे कामगार आपणास मूषक नियत्रंणाचे काम करताना पहावयास मिळतील. आज मार्च महिन्याची १२ तारीख. या मूषक नियत्रंण विभागातील ७६ कामगारांचे आजही वेतन झालेले नाही. महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात हे मूषक नियत्रंण कामगार काम करत असताना या कामगारांचा जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचा पगार झालेला नाही. महापालिका व ठेकेदार यामध्ये मूषक नियत्रंण कामगारांची ससेहोलपट व उपासमार होत आहे. समस्या गंभीर आहे. उद्या मूषक नियत्रंण कामगारांचा अथवा त्यांच्या परिवाराच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील. समस्या गंभीर आहे. मूषक नियत्रंण कामगारांचा भूकबळीने मृत्यू व्हाबा अथवा त्यांनी सावकारांकडून टक्केवारीने कर्ज घ्यावे याचे उत्तर महापालिका प्रशासनाने द्यावे. संबंधितांनी तात्काळ महापालिका आयुक्तांशी चर्चा करून याप्रकरणी तोडगा काढून लवकरात लवकर मूषक नियत्रंणच्या कामगारांना दोन महिन्याचे थकित वेतन मिळवून द्यावे अशी मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.