आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोनाच्या विरोधात देश लढाई करत असताना नवी मुंबईतील सर्वच घटक समाजसेवेत व्यस्त झाले आहे. राजकीय घटकांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक संस्थाही आपले योगदान देत आहेत. या सर्वामध्ये आज आघाडीवर राहून खऱ्या अर्थाने बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे अन्नपूर्णाची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे गोरगरीब मजुरांना, भिक्षेकऱ्यांना ते आहेत त्या ठिकाणी जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सुरू केले असून या कामाचे कोठेही फोटोसेशन नाही व सोशल मिडियावर आमदार मंदाताई म्हात्रेंकडून कोठेही कामाची मार्केटींग केली जात नाही. गोरगरीब घटकांसाठी, मजुर वर्गासाठी, भिक्षेकऱ्यांसाठी आज मंदाताई म्हात्रे स्वत: धावून जात आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करत आहेत. चांगली कामे लपून राहत नाही. आमदार मंदाताई म्हात्रेंच्या कार्याची आज नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसा होत असून एका चांगल्या व्यक्तिला आपण आमदार म्हणून निवडून दिल्याचे समाधानही नवी मुंबईकरांकडून व्यक्त केले जात आहे.
अनेक राजकीय घटकांकडून त्या त्या परिसरातील रहीवाशांना मास्क, सॅनिटायर्झसचे वाटप होत आहे. पालिका बाहेरील भागात जंतुनाशक फवारणी करत असताना नगरसेवक व अन्य राजकीय मंडळी स्वखर्चाने परिसरातील इमारतीमध्ये सदनिकांच्या बाहेर जावून जंतुनाशक फवारणी करत आहे. कोणी भाजी आणून स्वस्तात विकत आहे, कोणी दुकानाबाहेर पांढरे पट्टे मारत आहे. पण या राजकीय घटकांकडून जोरदार स्वत:च्या कामाचे फोटोसेशन केले जात असून त्याची जोरदार मार्केटींगही केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या समाजसेवेच्या हेतूबाबत नवी मुंबईकरांकडूनच संशय व्यक्त केला जात असून तीन महिन्यासाठी होत असलेल्या पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही स्टंटबाजी असल्याची टीकाही नवी मुंबईकरांकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रेंचे कार्य, त्यांचा नि:स्वार्थीपणा नवी मुंबईकरांना भावला असल्याने त्यांच्या कार्याला दादही मिळू लागली आहे.
आमदार मंदाताई म्हात्रेंकडे नव्याने दाखल होवू लागलेली मंडळी त्यांच्या उल्लेख ‘मावशी’ असा करत आहेत. ‘माय मरो व मावशी उरो’ ही उक्ती आज आमदार मंदाताई म्हात्रेंच्या कार्याकडे पाहून सार्थ ठरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सल्ला न देता आमदार मंदाताई म्हात्रे पहिल्या दिवसांपासून प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कृती करू लागल्या आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात आमदार मंदाताई म्हात्रेंनी जनजागृतीवर भर दिला. कोरोनाचे गांभीर्य जनतेला पटवून दिले आणि आरोग्य विभागाला तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले. त्यानंतर विविध संस्थांच्या माध्यमातून व आपल्या टीमच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची यादी बनविताना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यास अडथळे येणार नाहीत याची खातरजमा करून घेतली. स्वत:चा मोबाईल नंबर देवून ज्येष्ठांना काहीही त्रास झाल्यास तात्काळ संपर्क करण्याच्या सूचनाही आमदार मंदाताई म्हात्रेंनी दिल्या. त्यानंतर आपले एक महिन्याचे आमदारकीचे वेतनही त्यांनी पंतप्रधान निधीला देवून टाकत आपले योगदान दिले.
आता गेल्या काही दिवसापासून बेघर, रस्त्यावरील भिक्षेकऱी, ईमारतींचे सुरक्षा रक्षक, मजुर वा अन्य कोणाची जेवणाची सोय नसेल त्या लोकांची यादी बनवून त्या सर्वांनाच आमदार मंदाताई म्हात्रेंकडून जेवणाचे डब्बे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. अशा लोकांची यादी बनवून पाठविण्याचे आवाहनही आमदार मंदाताई म्हात्रेंनी केले आहे. जेवणापासून वंचित लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या या अन्नपूर्णेचा (आ. मंदाताई म्हात्रेंचा) कोठेही फोटो नाही , फोटोसेशन नाही, पण काम मात्र जोरदार सुरू आहे. या कामाची आता नवी मुंबईकरांकडूनही दखल घेतली जावू लागली आहे. आमदार मंदाताई म्हात्रे या सोशल मिडियावरही सक्रिय असल्याने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या किमान जवळपास ३० ते ३२ हजार नवी मुंबईकरांच्या प्रत्यक्षात संपर्कात आहेत. भेटीगाठी घेत आहेत. अन्नपूर्णेचा वसा चालविणाऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जोपर्यत कोरोनाचे संकट टळत नाही, तोपर्यत आपण जेवण पुरविण्याचे काम कायम ठेवणार असल्याचे सांगितले. काही हजाराचे काम करून प्रसिध्दीचा स्वार्थीपणा व स्टंटबाजी करणाऱ्या पोरकट राजकारण्यांना काम कसे नि:स्वार्थीपणे करावे, याचा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रत्यक्ष कृतीतून धडा घालून दिला आहे.