आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात बेलापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पहिल्या दिवसापासून मतदारसंघातील रहीवाशांकरीता रस्त्यावर उतरल्या आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनातील आरोग्य विभागात मोडणाऱ्या वाशी, नेरूळ, बेलापुर या पालिका रूग्णालयाकरिता व्हेंटीलेटरच्या सुविधेकरीता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आमदार निधीतून ५० लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना लेखी पत्र देताना पालिका रूग्णालयातील व्हेंटीलेटरकरीता आमदार निधीतून ५० लाख रूपये देण्याची मागणी केली आहे.
कोरोनाचे सावट नवी मुंबई शहरावर दिसू लागल्यावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्वप्रथम मतदारसंघातील रहीवाशांमध्ये जनजागृती करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी आपले आमदारकीचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला सर्वात अगोदर दिले. त्यानंतर नवी मुंबईतील बेघर, गोरगरीब, मजुर तसेच ज्यांची जेवणाची काहीही व्यवस्था नाही अशा मंडळींकरीता जेवणाच्या डब्याची सोय केली आहे. तसेच नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी लोकांचे जेवणाचे हाल होत आहेत, त्या त्या सर्व लोकांना जेवणाचे डब्बे पोहोचविण्याची तयारी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दर्शविली असून त्यासाठी यादी बनविण्याचे काम त्यांनी कार्यकर्त्यांना केले असून सोशल मिडियावरही आवाहन केले आहे.
आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देताना नवी मुंबईतील पालिका रूग्णालयात व्हेंटीलेटरचा तुडवडा असल्याने रूग्णालयांना व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ ५० लाख रूपयांचा निधी मंजुर करण्याची मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.