स्वयंम पी.आर. एजंन्सी
रत्नागिरी : जिल्ह्यातील शृंगारतळी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याने आता जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, असे असले तरी अजूनही धोका टळलेला नाही. नागरिकांनी बिनधास्तपणे वावरू नये. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. १४ एप्रिलपर्यंत सर्व नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यापुढे एकही रुग्ण वाढू नयेत, असे वाटत असेल तर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
जिल्ह्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या रुग्णाचा दुसरा अहवाल येण्याची वाट पाहण्यात येत होती. २४ तासांतील दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
‘लॉकडाऊन’ जाहीर होण्याआधी मुंबई-पुणे येथून तब्बल ५८ हजार चाकरमानी रत्नागिरीत दाखल झाले आहेत, तर परदेशातून ८५८ जण जिल्ह्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यातील अनेकजण ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा कर्मचाऱ्यांकडून परदेशातून आलेल्या व्यक्तींकडून घरातील लोकांची माहिती घेतली जात आहे. पोलिसपाटील, सरपंच यांच्या मदतीने ग्रामदल स्थापन करून, त्यांच्याकडून बाहेर गावाहून येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे.
कोरोनाची लक्षणे त्वरीत दिसून येत नाहीत, जे होम कॉरंटाईनमध्ये आहेत त्यांनी घराबाहेर पडू नये. आता एकही रूग्ण पॉझिटीव्ह नाही रत्नागिरीसाठी ही समाधानाची बाब असली तरी याचा आनंदोत्सव साजरा करू नका. १४ एप्रिलपर्यंत प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नका असे आवाहनही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.
प्रशासनाने यापुढेही सतर्कता म्हणून योग्य ती खबरदारी घेतली असून रत्नागिरीच्या सीमेत येणाऱ्या प्रवाशांना सीमेलगतच ठेवण्यात आले आहे. १४ दिवस प्रवाशांना सीमेलगत नियंत्रणात ठेवून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही प्रशासनाचे नियम मोडू नका असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी पॉझिटिव्ह रूग्णाचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे वृत्त पसरताच सोशल मिडियावर ‘रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी’ म्हणून पोस्ट फिरू लागली. आता आपल्याला धोका नाही, अशाही पोस्ट व्हायरल झाल्याने या नंतर प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोका अजूनही टळला नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी छोट्या-छोट्या गोष्टीसाठी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.