मुंबई : मुंबईत करोना साथीचा फैलाव वाढत चालला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’ जिथे आहे त्या कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असलेल्या चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
मातोश्री निवासस्थान वांद्रे पूर्व येथील कलानगरात असून कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच ही चहाची टपरी आहे. या चहावाल्याला करोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे. ‘मातोश्री’पासून जवळच असलेल्या या चहाच्या टपरीवर नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संरक्षणातील अंगरक्षक व अन्य पोलीस या टपरीवर चहासाठी जात असतात. त्यामुळेच चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सर्वांची आता तपासणी करण्यात येणार आहे.
मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ ही चहाची टपरी असून मागील दोन-तीन दिवसांपासून हा चहावाला परिसरात आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांनी शोध घेतला असता त्याला ताप तसेच खोकला येत असल्याचे समोर आले. त्यामुळे सोमवारी त्याची वैद्यकीय तपासणी पालिकेने सुरू केली असून चाचण्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्याला करोना झाला आहे का, हे स्पष्ट होईल असे पालिकेने स्पष्ट केले.
दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून मातोश्री, म्हाडा मुख्यालय ते साहित्य सहवास वसाहतीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात अग्निशमन दलातर्फे सॅनिटायझिंग फवारणी करण्यात आली असून ठिकठिकाणी जंतूनाशक पावडर फवारण्यात आली आहे. या भागात आणखी कुणाला ताप, खोकला येत आहे का याचा शोध पालिकेचा आरोग्य विभाग घेत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.