कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्यांची धरपकड करून तब्बल ८३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. सोमवारी कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. सोशल डिस्टन्सिंग ठेवत सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन असून घरातून कोणीही बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर कोणालाही रस्त्यावर फिरू दिले जात नाही. कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना लोकांनी घरी थांबून सुरक्षित रांहावे, असे आवाहन पोलिसांच्यावतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेकजण संधी मिळेल तेव्हा घराबाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
अशाच प्रकारे सोमवारी सकाळी मॉर्निंगसाठी रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल ८३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व ८३ जणांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलfस उपनिरीक्षक अमित बाबर यांनी सांगितले. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचा ठेवत सर्वांना शहर पोलिसांनी न्यायालयात नेले.