अॅड. महेश जाधव : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कामगारांना विमाकवच व दुर्देवाने कोव्हीड-१९ या रोगापासून सेवा बजावताना मृत झाल्यास त्यांना एक कोटीची नुकसान भरपाई व वारसाला नोकरी देण्याचा निर्णय घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहे. कामगार तसेच अधिकारी करत असलेल्या परिश्रमाची स्तुती करावी तितकी कमीच आहे. कोरोना या जीवघेण्या रोगाविरोधात लढा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य सेवेमधील अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर परिचारिका व अन्य सर्वच विभागातील कामगारांना केंद्र सरकारने ५० लाख रूपयांपर्यतचे विमा कवच जाहिर केले आहे. आपल्या महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कोणते कामगार त्यात बसतात व कोणते बसत नाही, याची वर्गवारी करावी. केंद्रातील विमा कवच योजनेचा अत्यावश्यक सेवेतील ठोक मानधनावर आणि पालिका आस्थापनेवरील ज्या कामगारांना केंद्र सरकारच्या विमा कवच योजनेचा लाभ मिळणार नसेल अशा सर्वच कामगारांसाठी पालिका प्रशासनाने स्वत:च्या पातळीवर विमा कंपनीशी चर्चा करून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून विमा कवच उपलब्ध करून देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या महापालिका कार्यक्षेत्रात कार्यरत असणार्या अत्यावश्यक सेवेतील ठोक मानधनावर आणि पालिका आस्थापनेवरील ज्या कामगारांना आपली सेवा बजावताना कोव्हीड-१९ या रोगापासून दुर्देवाने मृत्यू आल्यास त्यांना एक कोटीची अतिरिक्त नुकसान व त्यांच्या वारसाला पालिका प्रशासनाला नोकरी देण्याचा निर्णय जाहिर करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या बायकां-मुलांना, आई-वडीलांना घरी ठेवून ते नवी मुंबईकरांसाठी सेवा बजावत आहे. अत्यावश्यक सेवा बजावणारा कर्मचारी घरी सुखरूप येईल की नाही याबाबत घरच सध्या साशंक आहेत. त्यातच या कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास संसार उघड्यावर पडण्याची आणि संबंधित कामगारांची बायका-मुले देशोधडीला लागण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून अत्यावश्यक सेवा बजावताना कोणी कामगार कोव्हीड-१९ या रोगापासून मृत झाल्यास त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला एक कोटीची नुकसान भरपाई तसेच त्यांच्या वारसाला नोकरी देण्याचा निर्णय कामगार हितासाठी घ्यावा व तो निर्णय जाहिर करून कामगारांना दिलासा देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.